मुंबई: 'पुष्पा' या तेलगू चित्रपटातील 'ऊ अंटावा' या आयटम सॉंगमुळे चर्चेत आलेल्या समंथाच्या (Samantha Ruth Prabhu) चाहत्यांसाठी काळजी वाढवणारी एक बातमी आहे. आपल्याला मायोसिटिस (Myositis) हा दुर्मिळ आजार झाल्याचं समंथाने सांगितलं आहे. समंथाने रुग्णालयातील तिचा एक फोटो शेअर करत ही माहिती दिलीय.
समंथाने इन्स्टाग्रामवर (Instagram) हा फोटो शेअर करताना सांगितलं की ती मायोसिटिस नावाच्या एका दुर्मिळ आजाराशी लढत आहे. यातून बरं होण्यासाठी आपल्याला थोडा अधिक वेळ लागतोय.
काय आहे मायोसिटिस?
मायोसिटिस हा ऑटोइम्यून कंडिशन (Autoimmune Condition Myositis) असलेला आजार आहे. आपल्या शरीरातील मांस पेशींना आलेल्या सूजेमुळे मायोसिटिस हा आजार जडत असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय. हा आजार पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना हा आजार होण्याची शक्यता अधिक असते असंही म्हटलं जातं. मायोसिटिस ही एक अशी ऑटोइम्युन कंडिशन असते ज्याचा परिणाम शरीरातील मांस पेशींवर होतो.
मायोसिटिस आजाराची लक्षणं काय आहेत?
मायोसिटिस हा दुर्मिळ आजार असून त्यामध्ये शरीरातील मांस पेशींमध्ये वेदना होणे, दम लागणे, श्वास घेण्यात अडचण येणे अशी लक्षणं दिसून येतात. मायोसिटिस ही एक ऑटोइम्यून कंडिशन असून ल्यूपस, व्हायरस, सर्दी, फ्लू आणि या प्रकारच्या इतर आजारांच्या औषधांच्या साईड इफेक्टमुळे होत असल्याचं तज्ज्ञ सांगतात. मायोसिटिसचे पॉलिमायोटिस (polymyositis) आणि डर्माटोमायोसिटिस (dermatomyositis) असे दोन प्रकार आहेत.
मायोसिटिसवर उपाय काय?
आरोग्य क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे मायोसिटिस या आजारावर अद्याप तरी कोणताही ठोस उपाय नाही. पण नियमित तपासणी, व्यायाम, योगा आणि इम्युनोसप्रेसेन्ट औषधं याच्या वापराने हा आजार बरा होऊ शकतो. यामुळे अखडलेल्या मांस पेशी मोकळ्या होण्यास मदत होते. तसेच यामुळे मांस पेशी अधिक शक्तीशाली होण्यात मदत होते.
मायोसिटिस या आजाराचं निदान झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. या आजारावर वेळीच उपचार सुरू झाल्यास त्याची तीव्रता कमी होते.