Ankita Lokhande and Vicky Jain Help Sandeep Singh During Mumbai Fire: मुंबईतील गगनचुंबी आणि पॉश इमारतींमधील आगीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशातच अंधेरी वेस्टच्या सोरेंटो सोसायटीमध्ये गुरूवारी भीषण आगीची घटना घडली आहे. आगीनं काही क्षणात रौद्ररूप धारण केलं होतं. या आगीमुळे 12व्या, 13 व्या आणि 14व्या मजल्यावर गोंधळ उडाला होता. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते संदीप सिंह यांच्या घराला देखील आगीनं विळखा घातला होता. निर्माता संदीप सिंह यांचे घर सोरेंटो सोसायटीच्या 14 व्या मजल्यावर होते. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांचे कुटुंब आता सुरक्षित असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांनी घटनास्थळी जाऊन त्यांची मदत केली.
नेमकं घडलं काय?
मिळालेल्या माहितीनुसार, गुरूवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास अंधेरी पश्चिम येथील २३ मजली सोरेंटो टॉवरला भीषण आग लागली होती. काही क्षणात 12व्या, 13 व्या आणि 14व्या मजल्यावरून धुराचे लोट पाहायला मिळत होते. आगीनं अनेक घरांना विळख्यात घेतलं होतं. मुख्य म्हणजे आगीमुळे इलेक्ट्रिकल डक्ट तसेच केबल्स जळून खाक झाल्या. यामुळे इमारतीमध्ये काही क्षणात धुराचे साम्राज्य निर्माण झाले. आग पसरताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. तसेच शर्थीने आग विझवण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, अग्निशमन दलाने दाखवलेल्या तत्परतेमुळे तातडीने सुमारे 40 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. माहितीनुसार, या आगीचा फटका 14 व्या मजल्यालाही बसला. 14 व्या मजल्यावर प्रसिद्ध चित्रपट निर्माते संदीप सिंह यांचे घर आणि ऑफिस आहे. त्यांच्या घरालाही आग लागली होती. त्यांच्यावर अलिकडेच हर्नियाचं ऑपरेशन झाले होते. त्यांना डिस्चार्ज देण्यात आले होते. मात्र, त्यानंतर ते राहत असलेल्या टॉवरला भीषण आग लागली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोनुसार, संदीप यांना कोणतीही दुखापत झालेली नसल्याचं दिसून येत आहे.
घटनेची माहिती मिळताच संदीप यांची मैत्रीण मदतीसाठी धावून गेली. अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन तातडीने संदीप यांच्या घरी गेले. तसेच संदीप यांना त्यांच्या इमारतीतून सुरक्षितरित्या बाहेर काढले. दोघांनी संदीप यांना आपल्या घरी नेले. सध्या अंकिता, विकी आणि संदीप या तिघांचा फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या घटनेची माहिती पसरताच एका नेटकऱ्याने 'तुम्ही दोघांनीही खूप चांगले काम केले आहे' अशी पोस्टवर कमेंट केली आहे. दरम्यान, इमारतीतील इतर रहिवाशांना सुरक्षितपणे पायऱ्यांद्वारे बाहेर काढण्यात आले.