मुंबई : सलमान खान आणि शाहरुख खान यांचं नातं संपूर्ण भारताला माहिती आहे. काही वर्षांपूर्वी या दोघांमधून विस्तव जात नसे. दोघेही कधी एका पार्टीत दिसले नव्हते. पण अचानक दोघांमधलं वैर विरघळलं. आता दोघे चांगले मित्र आहेत. याच मैत्रीपोटी या लॉकडाऊन काळात शाहरूखसाठी सलमानने एक फिल्म ऑफर केली. पण सलमानची ही ऑफर शाहरूखने नाकारली आहे.
लॉकडाऊन काळात शाहरूखने खूप स्क्रीप्टस वाचल्या. जवळपास 50 स्क्रिप्ट्सचं वाचन त्यानं केलं. पैकी 30 त्याला अजिबात आवडल्या नाहीत. आणि शेवटी 20 स्क्रीप्टवर त्याने आपलं लक्ष केंद्रित केलं. यात सलमानची फिल्म होती. सलमानने शाहरूखला एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका देऊ केली होती. हा चित्रपट होता गन्स ऑफ नॉर्थ. यातल्या पोलीस अधिकाऱ्याची भूमिका शाहरूखने करावी अशी त्याची इच्छा होती. गन्स ऑफ नॉर्थ हा सिनेमा म्हणजे आपला मराठीतला मुळशी पॅटर्न. या सिनेमात उपेंद्र लिमयेनं साकारलेल्या पोलीस शाहरूखने साकारावा अशी त्याची इच्छा असावी. पण ती शाहरूखने नाकारली. कारण ती व्यक्तिरेखा सिनेमाच्या केंद्रस्थानी नव्हती.
या काळात संजय लीला भन्साळी यांनीही एक संहिता शाहरूखला दिली. प्रख्यात गीतकार साहीर लुधयानवी यांच्यावरचा बायोपिक होता तो. पण तोही शाहरूखने नाकारला. हा सिनेमा खूपच गंभीर होईल अशी शक्यता त्याला वाटली असावी. त्यानंतर त्याला ऑफर आली ती मधुर भंडारकर यांच्याकडून. मधुरही एक रिअलिस्टिक सिनेमा करतायत. शाहरूखने त्यांची स्क्रीप्ट ऐकली. सिनेमाचं नाव होतं इन्स्पेक्टर गालिब. हा टिपिकल थ्रिलर सिनेमा होता. पण शाहरूखने हा सिनेमाही नाकारला.
खरंतर झीरोच्या अपयशानंतर शाहरूखला एका चांगल्या हिटची गरज आहे. शाहरूखने यापूर्वी एक बायोपिक साईन केला होता. सिनेमाचं शूटही सुरू होणार होतं. हा सिनेमा होता राकेश शर्मा यांचा सॅल्यूट हा सिनेमा तो करणार होता. पण झिरोच्या अपयशानंतर पुन्हा एक सिनेमा अतंराळाशी संबंधित नको म्हणून शाहरूखने हा सिनेमा नाकारला. अली अब्बास झफर यांनीह मिस्टर इंडिया हा सिनेमाही त्याच्यासमोर ठेवला. त्यातला व्हिलन शाहरूखने करावा असं त्यांना वाटत होतं. पण जर मिस्टर इंडिया कुणी दुसरंच असणार आहे तर मग हा सिनेमा का करावा असं वाटून शाहरूखने हा सिनेमा सोडला.
म्हणजे 50 स्क्रिप्ट वाचून 20 कडे लक्ष देऊन शाहरूखने चार सिनेमे करण्याचं निश्चित केलं आहे. यात राजकुमार हिरानीच्या एका सिनेमाचा समावेश आहे. आता इतका सगळा नकार देऊन फायनली पठाण नामक सिनेमाचं शूट शाहरूख सुरू करतो आहे. यश चोप्रा यांच्या पुण्यतिथीला याचं चित्रिकरण सुरू होणार आहे.