bollywood : ही कथा त्या ‘विश्वसुंदरी’ची आहे जिने देशाचे नाव संपूर्ण जगभर उज्ज्वल केले. तिचा जन्म 9 डिसेंबर 1981 रोजी झाला. ही ‘विश्वसुंदरी’ चित्रपटसृष्टीत आली तेव्हा तिने आपल्या सौंदर्याने तिथेही जादू निर्माण केली. अभिनेत्रीने लहानपणापासूनच चढ-उतार पाहिले. आई हिंदू होती तर पहिले वडील ख्रिश्चन आणि दुसरे वडिल मुस्लिम होते. या ‘विश्वसुंदरी’ने वैयक्तिक आयुष्यात दोन लग्न केली आहेत आणि लग्नानंतर लगेचच एका मुलीची आई बनली.
2001 मध्ये आलेल्या ‘रहना है तेरे दिल में’ या चित्रपटातील भोळी रीना आणि मॅडीची प्रेमकहाणी प्रेक्षकांच्या मनाला भिडली होती. ही फिल्म त्या काळी बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरली होती, पण जेव्हा ती टीव्हीवर दाखवली गेली तेव्हा सुपरहिट ठरली. आज ती कल्ट फिल्म मानली जाते. या चित्रपटातूनच अभिनेत्री दीया मिर्झा आणि आर. माधवन यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. दिया मिर्झाचे वैयक्तिक आयुष्यही एखाद्या चित्रपटातील एखाद्या स्टोरीसारखेच आहे. लग्न करताच ती टीनएज मुलीची आई बनली.
दीयाची आई दीपा या इंटिरियर डिझायनर होत्या. त्यांनी जर्मन आर्किटेक्ट फ्रँक हेंड्रिच यांच्याशी लग्न केले होते. दीया साडेचार वर्षांची असताना तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला. त्यानंतर तिच्या आईने हैदराबादमध्ये अहमद मिर्झाशी लग्न केले. दीयाने एका मुलाखतीत सांगितले होते की, "मी आठ वर्षांची असताना माझे वडील फ्रँक हेंड्रिच यांचे निधन झाले. माझ्या आईने एका मुस्लिम व्यक्तीशी लग्न केले, ज्यांना मी अब्बा म्हणत असे. मी त्यांच्या घरीच मोठी झाले. माझी आई बंगाली असल्याने आम्ही दिवाळी-दसरा-दुर्गापूजा साजरे करत असू. माझे ख्रिश्चन वडील असल्याने ख्रिसमस-ईस्टरही साजरे केले जात. ईदही साजरी केली जायची." दीयाचे सावत्र वडील 2003 मध्ये वारले.
दीया मिर्झाच्या करिअरची सुरुवात आईसोबतच्या एका वादामुळे झाली. त्या वेळी ती फक्त 14 वर्षांची होती. तिला महागडे शूज हवे होते, पण आईने सांगितले की पैसे झाडावर लागत नाहीत. ही गोष्ट दीयाच्या मनाला लागली. तिने अभ्यासासोबतच मार्केटिंगचे काम सुरू केले, पैसे जमवले. रागात तिने आईला सांगितले होते, "पाहशील, मी स्वतः पैसे कमवेन. 18 वर्षांची झाले की माझी स्वतःची गाडी असेल. 21 वर्षांची झाले की माझे स्वतःचे घर असेल."
दहावी पूर्ण होताच दीयाला मॉडेलिंगचे ऑफर मिळू लागले. फॅशन शोमध्ये दोन तासांत चांगले पैसे मिळाले. तिने मॉडेलिंगसोबतच मार्केटिंगचे काम सुरूच ठेवले. नंतर २००० साली अचानक ‘मिस इंडिया’ स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळाली. तिच्या वडिलांनी तिला मुंबईला जाण्यास परवानगी दिली. या स्पर्धेत ती रनरअप ठरली. त्याच वर्षी तिने ‘मिस एशिया पॅसिफिक’ किताब जिंकला. याच वर्षी लारा दत्ता ‘मिस युनिव्हर्स’ आणि प्रियंका चोप्रा ‘मिस वर्ल्ड’ ठरल्या.
दीयाने 2001 मध्ये ‘रहना है तेरे दिल में’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर दीवानापन, तुमको न भूल पाएंगे, दम, तुमसा नहीं देखा, ब्लॅकमेल, परिणीता, अलग, कॅश, दस कहानियां, जय-वीरू, हम तुम और घोस्ट अशा चित्रपटांमध्ये तिने काम केले. मात्र तिच्या बहुतांश फिल्म्स फ्लॉप ठरल्या.
18 ऑक्टोबर 2014 रोजी दीयाने आपला बिझनेस पार्टनर साहिल संघा याच्याशी लग्न केले. त्यांची पहिली भेट एका चित्रपटाच्या निमित्ताने झाली होती. चित्रपटाचे नाव होते ‘कुछ इस तरह’. एका मुलाखतीत दीयाने सांगितले होते, "मी त्यांचा आवाज फोनवर ऐकला आणि भुरळले. त्यांचा चेहरा पाहण्यासाठी मी आतूर झाले. पण ती फिल्म कधी बनलीच नाही." साहिल संघा सिख होते. दोघे 2009 पासून एकत्र होते. मात्र 2019 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. घटस्फोटाचे कारण मात्र उघड केले नाही.
फेब्रुवारी 2021 मध्ये दीयाने बिझनेसमन वैभव रेखी याच्याशी हिंदू पद्धतीने लग्न केले. दोघांचेही हे दुसरे लग्न होते. वैभवच्या पहिल्या लग्नातून त्याला एक मुलगी आहे. दीया मिर्झा दुसऱ्या लग्नाआधीच प्रेग्नंट झाली होती. लग्नानंतर काही काळातच मे 2021 मध्ये तिने एका मुलाला जन्म दिला. एका मुलाखतीत तिने सांगितले होते की, तिची सावत्र मुलगी समायरा तिला आई म्हणून हाक मारत नाही. मला त्याबद्दल काही अडचणही नाही. ती मला नावानेच हाक मारते. त्यामुळे माझा मुलगाही अनेकदा मला नावानेच हाक मारतो, जे फार मजेशीर वाटते."
इतर महत्त्वाच्या बातम्या