मुंबई : संपूर्ण जगाला विळखा घालणाऱ्या (Coronavirus) कोरोना व्हायरसच्या संसर्गापासून कलाविश्वही मागे राहिलेलं नाही. अनेक कलाकारांना या विषाणूचा संसर्ग झाला. कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आलेल्या सर्वच सेलिब्रिटींनी मोठ्या जबाबदारीनं त्यांच्या संसर्गाबाबत सर्वांनाच माहिती दिली. विलगीकरणाच्या सर्व नियमांचं पालनही केलं. आता यातच आणखी एका अभिनेत्रीची याच संदर्भातील सोशल मीडिया पोस्ट व्हायरल होत आहे.

ही अभिनेत्री आहे रकुल प्रीत सिंह (rakul preet singh ). रकुलनं नुकतंच 'मेडे' या चित्रपटाचं चित्रीकरण करण्यास सुरुवात केली. त्यादरम्यानच तिला कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिनं ही माहिती दिली. ज्यानंतर तिच्या या पोस्टच्या कमेंट बॉक्समध्ये चाहत्यांनी ती लवकर बरी होईल अशा शब्दांत तिला धीर दिला.

रकुलनं पोस्टमध्ये नेमकं काय लिहिलं?

मी तुम्हा सर्वांनाच सांगू इच्छिते की, माझा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. मी सध्या विलगीकरणात असून, पूर्णपणे ठणठणीत आहे. येते काही दिवस मी पूर्ण आराम करणार आहे. म्हणजे लवकरच मी चित्रीकरणाला जाऊ शकेन. रकुलनं तिच्या संपर्कात आलेल्या सर्वांनाच कोरोना चाचणी करुन घेण्याची विनंती केली आहे. इतरांच्या सुरक्षिततेचाही विचार करत तिनं ही पोस्ट केली आहे.

दरम्यान, या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात करण्यापूर्वी रकुल मागील महिन्यामध्ये तिच्या कुटुंबीयांसमवेत सुट्टीवर गेली होती. मालदीव येथे तिनं सुट्टीचा आनंद घेतला होता.




रकुलच्या आगामी चित्रपटांबाबत सांगावं तर, तिचं वेळापत्रक अतिशय व्यग्र असणार आहे. क्रॉस बॉर्डर लव्ह स्टोरीवर आधारित एका चित्रपटातून ती झळकणार आहे. या चित्रपटाचं नाव अद्यापही प्रसिद्ध करण्यात आलेलं नाही. अर्जुन कपूर, अदिती राव हैदरी आणि जॉन अब्राहम हे कलाकारही या चित्रपटातून झळकणार आहेत.

अजय देवगनची निर्मिती आणि दिग्दर्शन असणाऱ्या Mayday या थ्रिलर-ड्रामा प्रकारच्या चित्रपटात ती एका वैमानिकाच्या भूमिकेत दिसेल. बिग बी अमिताभ बच्चन हेसुद्धा या चित्रपटाचा भाग असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळं रकुलच्या आगामी चित्रपटांबाबत चाहत्यांमध्येही उत्सुकता आहे.