Elnaaz Norouzi : इराणमधील (Iran) हिजाब विरोधी चळवळ दिवसेंदिवस आक्रमक होताना पाहायला मिळत आहे.  विविध सेलिब्रिटी आणि नेटकऱ्यांकडून इराणमधील हिजाब चळवळीचं समर्थन केलं जात आहे. सेक्रेड गेम्स या वेब सीरिजमधील अभिनेत्री एलनाज नौरोजीने (Elnaaz Norouzi) देखील अनोख्या पद्धतीने या चळवळीचे समर्थन केले असून हिजाबच्या वादात इराणमध्ये मारल्या गेलेल्या महशा अमिनीच्या मृत्यूचा अनोख्या पद्धतीने निषेध केला असून एक खास संदेश देण्याचा प्रयत्न केलाय.  एलनाज नौरोजी आज जर्मनीहून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरली. त्यावेळी तिने समोरच्या बाजूला 'वुमन-लाइफ-फ्रीडम' आणि 'फ्री-इराण' असे लिहिलेला टी-शर्ट घातला होता.


एलनाज नौरोजीने घातलेल्या टी शर्टवर इराणमध्ये मारल्या गेलेल्या काही लोकांची नावेही हॅशटॅगसह नमूद केली आहेत. विमानतळावर उतरल्यानंतर एलनाजने एबीपी न्यूजशी खास संवाद साधला.  "फक्त इराणच नाही तर जगातील प्रत्येक महिलेला तिच्या आवडीचे कपडे घालण्याचा अधिकार आहे. या टी-शर्टच्या माध्यमातून लोकांना पुन्हा एकदा तोच संदेश देऊ इच्छिते, असे नौरोजीने म्हटले आहे. 


"हिजाब संदर्भात निदर्शनात सहभागी होणाऱ्या महिलांना फक्त पाठिंबा देत नाही, तर गेल्या 43 वर्षांपासून इराणमध्ये होत असलेल्या अत्याचाराविरोधात आवाज उठवत आहे. यापुढेही मी आवाज उठवत राहिन, असे एलनाजने सांगितले. अलीकडेच एलनाज नौरोजीने  इराणमधील हिजाबच्या वादासंदर्भात इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता. एलनाजचा 'माय बॉडी माय चॉईस' नावाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती  वेगवेगळ्या प्रकारचे कपडे बदलून महिलांच्या आवडीनुसार कपडे घालण्याच्या स्वातंत्र्यावर संदेश देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. व्हिडीओ शेअर केल्यानंतर एलनाज जर्मनीला गेली होती,  आज मुंबईत परतली आहे. काही दिवसांनी तिने इन्स्टाग्रामवरील तो व्हिडीओ डिलीट केला आहे. व्हिडीओ डिलीट करण्याबाबत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात एलनाज म्हणाली की, हा व्हिडीओ अनेकांना समजला नाही. अशा परिस्थितीत कोणाच्याही भावना दुखावू नयेत म्हणून हा व्हिडिओ डिलीट केला.  


महिलेच्या मृत्यूनंतर इराणमध्ये आंदोलनाला सुरुवात


महसा अमिनी नावाच्या मुलीला हिजाब न परिधान केल्या प्रकरणी इराणच्या पोलिसांनी 13 सप्टेंबर रोजी अटक केली होती. त्यानंतर पोलिस कोठडीत असताना तिची तब्येत बिघडली आणि ती कोमात गेली. त्यानंतर महसा अमिनीचा मृत्यू झाला. पोलिसांच्या ताब्यात असताना या महिलेचा मृत्यू झाल्यामुळे महिलांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलनं करण्यास सुरुवात केली. जभगरातून महिलांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला जात आहे.