Bollywood Actors Struggle Life: जय-वीरू जोडी असो वा गब्बर सिंह आणि ठाकूर, किंवा मग बसंती आणि धन्नो असो, 1975 च्या 'शोले' चित्रपटातील (Sholey Movie) प्रत्येक पात्र असं होतं की, ते आजही प्रत्येकाच्याच लक्षात आहे. अशीच एक भूमिका या सिनेमात होती, ती म्हणजे, रहीम चाचा. त्यांचा 'इतना सन्नाटा क्यूं है भाई', हा डायलॉग आजही सर्रास आपल्या सर्वांच्या तोंडी असतो. ही भूमिका दिग्गज अभिनेते ए.के. हंगल यांनी साकारली होती. त्यांचं पूर्ण नाव अवतार किशन हंगल (AK Hangal) होतं. जे भारतीय सिनेसृष्टीतील एक ज्येष्ठ कलाकार होते. ज्यांनी आपल्या साधेपणानं, संवेदनशील अभिनयानं आणि आवाजातील खोलीनं लाखो प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवलं. 1 फेब्रुवारी 1914 रोजी सियालकोट इथे जन्मलेले हंगल हे केवळ एक उत्तम अभिनेतेच नव्हते, तर स्वातंत्र्यसैनिक आणि नाट्य कलाकार देखील होते.
अभिनेते ए.के. हंगल यांनी वयाच्या 52 व्या वर्षी आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली आणि 250 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं. 'शोले' चित्रपटातील 'रहीम चाचा' या भूमिकेनं आणि 'इतना सन्नाटा क्यूं है भाई' सारख्या संवादांनी त्यांना सिनेप्रेमींमध्ये एक वेगळी ओळख मिळवून दिली.
प्रत्यक्षात अवतार किशन हंगल चित्रपटांत येण्यापूर्वी स्वातंत्र्यसैनिक होते. सुरुवातीच्या काळात ते शिंपी म्हणून काम करायचे, परंतु 1929 ते 1947 दरम्यान ते भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातही सक्रिय होते. त्यांना तीन वर्ष कराची तुरुंगात कैदेत राहावं लागलं. त्यांची सुटका झाल्यावर ते भारतात परत आले.
तब्बल 250 सिनेमांमध्ये केलं काम
'लाइफ अँड टाईम्स ऑफ ए.के. हंगल' या पुस्तकातही त्यांच्या आयुष्यातील अस्पृश्य पैलूंचा उल्लेख आहे. त्यानुसार, त्यांच्या वडिलांच्या जवळच्या मित्रानं त्यांना उदरनिर्वाहासाठी शिवणकाम करण्याचा सल्ल दिलेला. त्यानंतर हंगल यांनी इंग्लंडमधील एका कुशल शिंप्याकडून ही कला शिकली. हंगल यांनी वयाच्या 52 व्या वर्षी 1966 मध्ये 'तीसरी कसम' या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली, ज्यामध्ये त्यांनी राज कपूर यांच्या मोठ्या भावाची भूमिका साकारली होती. 1966 ते 2005 पर्यंत त्यांनी सुमारे 250 हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं, ज्यात 'शोले' (1975), 'नमक हराम', 'आंधी', 'बावर्ची', 'लगान' (2001) आणि 'शरारत' (2002) सारख्या चित्रपटांचा समावेश आहे.
त्यांनी राजेश खन्ना यांच्यासोबत 'आप की कसम', 'अमर दीप', 'कुद्रत' आणि 'सौतेला भाई' यासह 16 चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांची खासियत अशी होती की, ते बहुतेकदा वडील, काका किंवा वृद्ध अशा सकारात्मक भूमिकांमध्ये दिसले. पण 'प्रेम बंधन' आणि 'मंजिल' सारख्या काही नकारात्मक भूमिकांमध्ये त्यांनी अभिनय केला होता.
2001 मध्ये 'लगान' मध्ये शंभू काका आणि 2012 मध्ये 'कृष्णा और कंसा' मध्ये उग्रसेन यांच्या आवाजासाठी त्यांना खूप प्रशंसा मिळाली. हंगल यांनी दूरदर्शनवरही काम केलं. 2012 मध्ये 'मधुबाला - एक इश्क एक जुनून' या चित्रपटात त्यांचा शेवटचा टीव्ही शो होता, जो 100 वर्षांच्या भारतीय चित्रपटसृष्टीला श्रद्धांजली होता. हंगल यांनी वाढत्या वयानंतरही चित्रपटसृष्टी सोडली नाही आणि शेवटपर्यंत त्यांच्या अभिनयानं लोकांच्या मनावर राज्य केलं.
तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी ए.के. यांना श्रद्धांजली वाहिली. 2006 मध्ये हंगल यांना पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. 26 ऑगस्ट 2012 रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांची साधेपणा, देशभक्ती आणि अभिनयाप्रती असलेली समर्पण यामुळे त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीत एक विशेष स्थान मिळालं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :