मुंबई : बॉलिवूड अभिनेता आदित्य पांचोलीनं (Bollywood Actor Aditya Pancholi) बलात्काराचा (Rape Case) गुन्हा रद्द करण्यासाठी हायकोर्टात (Bombay High Court) याचिका दाखल केली आहे. मंगळवारी न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या खंडपीठासमोर आदित्य पांचोलीनं दाखल केलेल्या याचिकेवर प्राथमिक सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयानं मुंबई पोलिसांना (Mumbai Police) नोटीस बजावून या याचिकेवर उत्तर दाखल करण्याचे निर्देश देत या प्रकरणाची सुनावणी सप्टेंबर महिन्यापर्यंत तहकूब केली आहे.
साल 2019 मध्ये करण्यात आलेल्या बलात्काराच्या या कथित आरोपाप्रकरणी मुंबई पोलिसांनी आदित्य पांचोलीविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात (Varsova Police Station) गुन्हा दाखल केला आहे. एका अभिनेत्रीनं केलेल्या आरोपानुसार आदित्य पंचोलीनं साल 2004 ते 2006 दरम्यान तिच्या कारकिर्दीच्या सुरूवातीच्या काळात तिला नशेच्या आहारी ढकलत वारंवार तिच्यावर शारिरीक अत्याचार केले आहेत. याची तक्रार मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला. मात्र अद्याप यात आरोपपत्र दाखल झालेलं नाही.
गेल्य तीन वर्षांत पोलिसांनी यात कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही, याचा अर्थ पोलिसांना यात काहीही आढळून आलेलं नाही. त्यामुळे सतत कारवाईच्या सावटाखाली आहोत ही भीती दूर करण्यासाठी आपण हा गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी याचिका दाखल करत असल्याचं अभिनेता आदित्य पांचोलीच्यावतीनं त्याचे वकील अभिनव चंद्रचूड यांनी कोर्टाला सांगितलं. तसेच याप्रकरणी आता पोलिसांनी बी समरी रिपोर्ट दाखल करण्याची वेळ आल्याचंही त्यांनी कोर्टाला सांगितलं. याची दखल घेत हायकोर्टानं मुंबई पोलिसांना नोटीस बजावत या याचिकेवर उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
आदित्य पांचोलीने अनेकदा आपलं लैंगिक शोषण केल्याचा आरोप संबंधीत बॉलिवूड अभिनेत्रीने केला होता. अभिनेत्रीच्या बहिणीने ई-मेलद्वारे याबाबत लेखी तक्रार दाखल केली होती.
आदित्य पांचोलीकडून आरोपांचं खंडन
माझ्यावरील सर्व आरोप खोटे असून माझ्याविरोधात विचारपूर्वक रचलेलं कारस्थान आहे. मला यामध्ये फसवलं जात असून याबाबत माझ्याकडे पुरावे आहे. संबंधित अभिनेत्री विरोधात मी मानहानीचा दावा दाखल केला आहे. हीच मानहानीची तक्रार मागे घेण्यासाठी या अभिनेत्रीने तिच्या वकीलांना माझ्या घरी पाठवल होतं. मात्र मी तक्रार मागे घेण्यास नकार दिल्याने मला संबंधीत अभिनेत्रीने बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली होती, असा दावा आदित्य पांचोलीने केला होता.