Shiv Thakeray: ‘बिग बॉस 16’चा फर्स्ट रनरअप आणि मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता शिव ठाकरे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी विषय आहे थेट त्याच्या लग्नाचा. अभिनेता शिव ठाकरे मुंडावळ्या बांधत बोहल्यावर चढला आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत शिवने चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. 'फायनली 'असा कॅप्शन देत त्याने हा फोटो शेअर केलाय. या फोटोत त्याची बायकोही आहे. त्याच्या या फोटोमुळे चाहत्यांना सरप्राईज मिळालंय. चाहत्यांसह अनेक सेलिब्रेटी त्याला शुभेच्छा देताना दिसतायत. 

Continues below advertisement

‘Finally’ कॅप्शन देत चाहत्यांना गुडन्यूज

अभिनेता शिव ठाकरेने आज (12 जानेवारी 2026) सकाळी इंस्टाग्रामवर मंडपातील एक फोटो शेअर केला असून, त्या फोटोमुळे सोशल मीडियावर एकच चर्चा रंगलीय. फोटोमध्ये शिव पारंपरिक मराठमोळ्या वराच्या वेशात दिसतोय. त्यानं मुंडावळ्या बांधल्या आहेत. त्याच्यासोबत त्याची बायकोही दिसतेय. पण तिचा चेहरा दिसत नाहीय. ती पाठमोरी उभी आहे. विशेष म्हणजे फोटोसोबत ‘Finally’ असं कॅप्शन देत त्यानं चाहत्यांना गुडन्यूज दिलीय.

Continues below advertisement

फोटो पाहून दोघंही विवाहमंडपात असल्याचं स्पष्ट दिसतं. मागे नातेवाईक, लग्नाची सजावट आणि विधींचं वातावरण दिसत असल्याने अनेकांनी शिववर अभिनंदनाचा वर्षाव सुरू केलाय.

सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा पाऊस

शिव ठाकरेने फोटो शेअर करताच अनेक सेलिब्रिटींनी कमेंट्स करत त्याला शुभेच्छा दिल्या. भारती सिंहने “हे कधी झालं? अभिनंदन!” अशी कमेंट केली. तसेच विक्की जैन, आकांक्षा पुरी, ऐश्वर्या शर्मा, जेमी लिव्हर यांसह अनेक कलाकारांनीही शिवला शुभेच्छा दिल्या आहेत.

लग्नाचा फोटो येताच चाहते म्हणाले, कुठे सुरुय शुटिंग ? 

लग्नाचा फोटो बघून अनेक चाहत्यांनी मात्र या फोटोवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. काही युजर्सनी “हे खरंच लग्न आहे की शूटिंगचा भाग?” असा सवाल केला आहे. तर काहींनी थेट “हे एखाद्या प्रोजेक्टचं शूट असणार” असं म्हणत लग्नाच्या चर्चांवर शंका व्यक्त केली आहे. एप्रिल फूलच्या पार्श्वभूमीवरही काहींनी मिश्किल प्रतिक्रिया दिल्या आहेत.

शिव ठाकरेविषयी ..

शिव ठाकरेचा जन्म 1989 साली अमरावती, महाराष्ट्र येथे झाला. त्याचं पूर्ण नाव शिव मनोहरराव उत्तमराव ठाकरे आहे. वडील पानाच्या दुकानावर काम करत होते. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी शिवने लहानपणी दूधाचे पॅकेट आणि वर्तमानपत्रं विकली. मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्याने मनोरंजनविश्वात स्वतःचं स्थान निर्माण केलं. शिव ‘एमटीव्ही रोडीज राइजिंग’ (2017) मध्ये सेमीफायनलपर्यंत पोहोचला. त्यानंतर ‘बिग बॉस मराठी सीजन 2’ जिंकून तो घराघरात पोहोचला. पुढे ‘बिग बॉस 16’चा फर्स्ट रनरअप ठरला आणि ‘खतरों के खिलाडी 13’मध्येही त्याने सहभाग घेतला. बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात शिव ठाकरे विजयी झाला. 

अभिनयासोबत व्यवसायातही यश

शिव ठाकरेने अभिनयासोबतच व्यवसायातही पाऊल टाकलं आहे. मुंबईत त्याने चहा-स्नॅक्सचं रेस्टॉरंट सुरू केलं असून ‘B.Real’ नावाचा डिओडोरंट ब्रँडही लॉन्च केला आहे. सोशल मीडियावर तो प्रचंड लोकप्रिय असून त्याचे सुमारे 2.1 मिलियन फॉलोअर्स आहेत.