Actor Vishal Nikam and Actress Akshaya Hindalkar Engagement: 2025 साली अनेक कलाकार विवाहबंधनात अडकले होते. 2026 च्या सुरूवातीला काही मराठी कलाकारांनी लग्नगाठ बांधली. बिग बॉस मराठी फेम आणि स्टार प्रवाह वाहिनीवरील 'येड लागलं प्रेमाचं' या मालिकेतील 'राया' अर्थात विशाल निकम सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. विशालला त्याची सखी सापडली आहे. तो लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. विशाल आणि त्याच्या आयुष्यातील स्वप्नसुंदरी अभिनेत्री अक्षया हिंदळकर या दोघांचा नुकताच साखरपुडा पार पडला. त्यांनी गुपचूप आपला साखरपुडा उरकला असून, या विशेष कार्यक्रमातील फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
काही महिन्यांपूर्वी विशाल निकमने आपल्या सखीसोबतचे फोटो सोशल मीडियात शेअर केले होते. या फोटोतून त्याने थेट अभिनेत्रीचा चेहरा उघड केला नव्हता. दोघांचा रोमँटिक अंदाज पाहून विशालच्या आयुष्यातील स्वप्नसुंदरी नक्की कोण? असा प्रश्न नेटकरी आणि चाहत्यांना पडला होता. दरम्यान, एका व्हिडिओतून दोघांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली. विशालच्या आयुष्यातील स्वप्नसुंदरी अभिनेत्री अक्षया हिंदळकर असून, ही माहिती उघड होताच चाहत्यांना आनंद झाला. दोघांनी गुपचूप साखरपुडा उरकला. अक्षयाने काल खास मेहेंदीचे फोटो सोशल मीडियात शेअर केले होते. तसेच साखरपुड्याचे फोटो शेअर केले.
अक्षयाने या खासप्रसंगी हिरव्या रंगाची साडी नेसली होती. या साडीमध्ये अक्षया सुरेख दिसत होती. तर, विशालने गर्द पिवळ्या रंगाचा कुर्ता घातला होता. या पोस्टवर चाहते आणि नेटकऱ्यांनी कमेंट करून शुभेच्छांचा वर्षाव केला. विशालने त्याच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियात शेअर केले आहेत. या फोटोंवर त्यानं लक्षवेधी कॅप्शन दिलं आहे. 'देव खरंच माझ्या बाजूने होता जेव्हा त्याने तुला माझ्यासाठी लिहिलं…' सध्या ही पोस्ट व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विशाल आणि अक्षया यांचे लग्न गंगा घाटावर होणार आहे. हा लग्नसोहळा पाहण्यासाठी चाहत्यांनी उत्सुकता दर्शवली.
अभिनेत्री अक्षया हिंदळकर मराठी मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. तिची 'पुन्हा कर्तव्य आहे' ही मालिका प्रचंड गाजली. अक्षया सोशल मीडियावरही प्रचंड सक्रीय असते. तिचे रील्स, व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियात व्हायरल होतात. तर, विशाल निकमला बिग बॉस मराठी आणि मालिकेतून प्रसिद्धी मिळाली.
