सोलापूर : राज्याचं लक्ष लागलेल्या सोलापूर (Solapur) जिल्हा परिषदेतील निकालाचे अपडेट हाती येत असून माळशिरस तालुक्यात खासदार धैर्यशील मोहिते पाटलांना भाजपने धक्का दिलाय. तसेच, आमदार उत्तम जानकर यांचे सुपुत्र जीवन जानकर यांचाही पराभव झाला आहे. हाय व्होल्टेज ड्रामा रंगलेल्या दहिगाव जिल्हा परिषद गटामध्ये भाजपने मारली मुसंडी मारली. आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती यांनी शरद पवार गटाचे आमदार उत्तमराव जानकर यांचे पुत्र जीवन जानकर यांचा पराभव करत विजयाचा गुलाल उधळला. दहिगाव जिल्हा परिषद गटातील दोन्ही पंचायत समिती देखील भाजपने जिंकल्या आहेत. माळशिरसमधील गुरसाळे गणातून अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनाही पराभवाचा धक्का बसला आहे. त्यामुळे, भाजपने मोहिते पाटलांच्या बालेकिल्ल्यात गुलाल उधळला. 

सोलापुरातील माळशिरस तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळाली. विद्यमान खासदार आणि आमदार यांनी एकत्र येत भाजपला आव्हान दिलं होतं. भाजपचे राम सातपुते यांनी येथील जिल्हा परिषद गटातून पत्नी संस्कृती सातपुते यांना उभे केले होते. अखेर, येथे भाजपच्या संस्कृती सातपुते दहिगाव गटातून विजयी झाल्या आहेत. बिग फाईट म्हणून माळशिरस तालुक्यातील दहिगाव जिल्हा परिषद गटाकडे पाहण्यात आले. येथे माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांची लढत शरद पवार गटाचे विद्यमान आमदार उत्तमराव जानकर यांचे चिरंजीव जीवन जानकर यांच्यासोबत होती. 

प्रचारात 4 महिन्यांच्या मुलीला आणल्याने टीका

संस्कृती सातपुते यांनी आपल्या चार महिन्याच्या मुलीला घेऊन निवडणूक काळात प्रचार केल्याचे फोटो समोर आले होते. चार महिन्याच्या मुलीला घेऊन संस्कृती सातपुते प्रचार करत असल्यामुळेच महिला वर्गाची मोठी सहानुभूती मिळू लागल्यानंतर आता विरोधकांकडून, सोशल मीडियातून सातपुते यांच्यावर टीका करण्यात आली होती. दहिगाव येथे पालकमंत्री जयकुमार गोरे यांची सभा सुरू असताना हे बाळ बराच वेळ पालकमंत्र्यांच्या मांडीवर आणि त्यानंतर वडील राम सातपुते यांच्या मांडीत खेळताना दिसले होते. त्याचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. 

आमदारांची प्रतिष्ठा पणाला

आपल्या पत्नी आणि बाळावर होत असलेल्या टीकेबाबत राम सातपुते यांनी मात्र आपल्या भाषणात तीव्र नाराजी व्यक्त करताना तुमची दुश्मनी माझ्याशी आहे. मग माझ्या चार महिन्याच्या लहानबाळावर टीका करायचे काय कारण? असा सवाल त्यांनी विरोधकांना केला. त्यामुळे देव तुमचं कधीच भलं करणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया सातपुते यांनी आपल्या भाषणात दिली होती. एकंदर माळशिरस तालुक्यातील या प्रतिष्ठेच्या लढतीमध्ये आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. अखेर, माजी आमदार राम सातपुते यांनी येथे भाजपचे कमळ खुलवले आहे. 

हेही वाचा

सोलापूर जिल्हा परिषद निवडणूक निकाल; माढ्यात राष्ट्रवादीने खातं खोललं, विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी