Dhananjay Powar Troll On Aashadhi Wari: राज्यभरातून शेकडो पालख्या पंढरीच्या (Pandharpur) दिशेनं निघाल्या आहेत. ऊन, वारा, पाऊस यांची जराशीही तमा न बाळगता कित्येक पावलं विठ्ठल भेटीच्या ओढीनं पंढरीकडे कूच करत आहेत. अशातच दरवर्षी अनेक सेलिब्रिटी वारीत सहभागी होत असतात. मग, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर (Social Media Influencer) मागे कसे राहतील? बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात झळकलेला अवघ्या महाराष्ट्राचा लाडका प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर धनंजय पोवारही (Dhananjay Powar) यंदाच्या वर्षी वारीत सहभागी झालेला. पण, धनंजय पोवार यामुळे चांगलाच ट्रोल झाला आहे. बरं धनंजय पोवारनंही ट्रोलर्सना चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
धनंजय पोवार आषाढी वारीमध्ये सहभागी झालेला. त्यानं वारीतले आपले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. पण, कशावरही काही कमेंट करणार नाहीत, ते नेटकरी कसले. नेटकऱ्यांनी धनंजय पोवारचे फोटो पाहिले आणि धडाधड कमेंट करायला सुरुवात केली. पण, नेटकऱ्यांच्या धारेदार कमेंट्सनी धनंजय पोवारच्या मनाला जखमा झाल्या. त्यानंतर धनंजय पोवारनं ट्रोलर्सना चांगलंच फैलावर घेतलं आहे. तशी पोस्ट धनंजय पोवारनं इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.
नेमकं काय घडलं?
धनंजय पोवारनं वारीतले फोटो सोशल मीडियावर शेअर करताच नेटकऱ्यांना त्याला ट्रोल करायला सुरुवात केली. "इथून पुढे मटण खाणं सोडा", "रोज मटण खाणारे वारीला आले", अशा कमेंट नेटकऱ्यांनी धनंजय पोवारच्या वारीच्या फोटोंवर केल्यात. धनंजयने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.
धनंजय पोवार काय म्हणाला?
प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर धनंजय पोवार म्हणाला की, "काही लोक वारी करताना किंवा देवभक्ती करताना इतरांच्या खाण्या-पिण्यावरुन किंवा व्यवसायावरुन जज करतात. पण असं देव कधीच करत नाही. मटण खाणं ही माझी वैयक्तिक आवड आहे. पण माझं मन मात्र विठोबाच्या चरणी आहे".
"वारी शरीराने केली जाते. पण खरी वारी मनातली असते. देव कर्म बघत नाही, भाव बघतो. विठोबा त्याच भक्तासाठी मटण तोडायला आला होता. देवाने भक्ताचा व्यवसाय बघितला नाही...त्याची निष्ठा बघितली. मग तुम्ही कोण की माझी भक्ती नाकारायची? मी देवावर प्रेम करतो आणि हे प्रेम खाण्यापिण्याच्या गोष्टींनी कमी होत नाही. देवाचं नाव घेणं कोणाच्याही मालकीचं नाही. कारण देव कोणाचाही द्वेष करत नाही, मग तुम्ही का करताय? मी मटण खातो, हो. पण रोज विठोबाचं नावंही घेतो. देव माझं हृदय बघतो. थाळीत काय आहे ते नाही. म्हणून मीही वारी करतो आणि अभिमानाने करतो", असं म्हटलं आहे.
"तू भक्त आहेस आणि भक्ती तुझ्या मनातून येते. हे कोणालाही सिद्ध करण्याची गरज नाही. पण तरी कुणी कमी लेखत असेल तर हे उत्तर देणं हे सत्यासाठी उभं राहणं आहे. देव तिथेच आहे जिथे खरं मन आहे. बाकी सर्व लोकांचं बोलणं. वारीनंतर वाऱ्यासारखं उडून जातं", असं म्हणत डीपीने ट्रोलर्सला चांगलंच सुनावलं आहे, असंही धनंजय पवार म्हणाला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :