Navi Mumbai: नवी मुंबईतील पनवेल (Panvel) परिसरात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली होती.यात पनवेल येथील तक्का भागात असलेल्या स्वप्नालय आश्रमाच्या बाहेर दोन दिवसांचे अर्भक आढळल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. हे अर्भक एका बास्केटमध्ये ठेवले गेले असून त्याचबरोबर त्याच्या जवळ दूध पावडर, दूधाची बाटली आणि एक चिट्ठीही ठेवण्यात आली होती. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवत तपास केला असता या अर्भकाच्या आई वडीलांचा शोधण्यात पनवेल पोलिसांना यश आले आहे.
आई-वडिलांनी केलं होतं लग्न, आठव्या महिन्यात बाळ
पुढे आलेल्या माहितीनुसार, प्रेम प्रकरणातून हे बाळ झाल्याचे आता उघड झाले आहे. सोबतच बाळाच्या आई-वडिलांनी लग्नही केल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र वडीलांच्या घरच्यांना मुलगी पसंत नसल्याने मुलगी स्वत:च्या आई वडिलांकडे भिवंडी येथे राहत होती. दरम्यानच्या काळात ती गर्भवती असल्याचे तिच्या घरच्यांना कळाले होते. अशातच तीला आठव्या महिन्यात बाळ झाले. सध्या पोलीसांनी आई वडीलांना ताब्यात घेतलं आहे. चौकशीत आई वडील बाळाला सांभाळण्यासाठी तयार असल्याचीही माहिती पुढे आली आहे. सध्या बाळ वात्सल्य ट्रस्टमध्ये असून सरकारी नियमानुसार आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून बाळ परत आई वडिलांना देण्यात येणार आहे.
कृपया मला माफ करा.. चिठ्ठीत नेमकं काय?
नवी मुंबईच्या पनवेल शहरात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली होती. शहरातील तक्का विभागात असलेल्या स्वप्नालय या मुलींच्या बालगृहाजवळ, फुटपाथवर दोन दिवसांचं नवजात अर्भक सापडलं. हे बालगृह महिला आणि बालविकास विभाग, महाराष्ट्र शासनाचे मान्यताप्राप्त असून, या संस्थेच्या इमारतीच्या खालच्या भागातच एका बास्केटमध्ये अर्भक आढळून आलं. प्रत्यक्षदर्शी आणि स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, हे अर्भक रात्रीच्या वेळेस कोणीतरी सोडून गेलं असावं. बास्केटमध्ये अर्भकाबरोबर सेरेलॅक, कपडे आणि एक इंग्रजीत लिहिलेली चिठ्ठीही सापडली. या चिठ्ठीत मी माझ्या बाळाचा सांभाळ करू शकत नाही. माझी आर्थिक परिस्थिती वाईट आहे, मानसिकदृष्ट्या मी सक्षम नाही. माझ्या बाळाची हेळसांड होऊ नये, त्याची काळजी घ्या. भविष्यात मला बाळाला भेटता आलं, तर नक्की भेटेन. कृपया मला माफ करा.”असे लिहिले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या