Bigg Boss Marathi 6: कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आता मैत्री आणि नात्यांपेक्षा वादाचे धुमारे अधिक उडू लागले आहेत. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये रुचिता आणि अनुश्री एकमेकींसमोर उभ्या ठाकल्या असून त्यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलं आहे. घरातील इतर सदस्य मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत असले, तरी या दोघींचा पारा मात्र कमी होताना दिसत नाहीये. 

Continues below advertisement

रुचिताची तिखट धार, अनुश्रीचा थेट वार

‘बिग बॉस मराठी’च्या घरात चौथा आठवडा सुरू होताच वातावरण अधिकच तापल्याचं पाहायला मिळत आहे. रुचिता जामदार सध्या घरातील चर्चेचा केंद्रबिंदू ठरत असून तिच्या वागणुकीमुळे संपूर्ण घरात अस्वस्थता पसरली आहे. सुरुवातीला करण सोनावणे याच्याशी तिचा जोरदार वाद झाला होता. त्यानंतर कॅप्टनपदाच्या उमेदवारीसाठी झालेल्या टास्कदरम्यान राकेश बापटने रुचितावर काही गंभीर मुद्दे उपस्थित केल्यानं परिस्थिती आणखी चिघळली. या आरोपांनंतर रुचिता भावनिक होत घरात रडताना आणि संताप व्यक्त करताना दिसली. तिच्या प्रतिक्रियांमुळे घरात गोंधळाची स्थिती निर्माण झाली असून ती प्रत्येकाशी वाद घालत असल्याचं चित्र आहे. कोणाचाही सल्ला ऐकून न घेता ती बेधडक बोलताना दिसत असून त्यामुळे इतर सदस्यांशी तिचे मतभेद अधिक वाढत आहेत. आजच्या भागात एक नवं समीकरण समोर येणार आहे. पहिल्यांदाच रुचिता आणि अनुश्री माने यांच्यात उघडपणे वाद रंगताना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

प्रोमोमध्ये दोघी वॉशरूमच्या परिसरात समोरासमोर बसलेल्या असून वातावरण तणावपूर्ण झालेलं दिसतंय. अनुश्री शांतपणे समजावण्याचा प्रयत्न करत असताना रुचिता मात्र आक्रमक भूमिकेत दिसते. “माझं मत मी मांडणारच,” असा सूर ती लावते. यावर अनुश्री तिला संयम राखण्याचा सल्ला देते आणि प्रत्येक प्रसंगी आक्रमक होणं योग्य नसल्याचं सांगते.

Continues below advertisement

वादातील काही बोचरे संवाद

रुचिता : "मला जेव्हा जे बोलायचं आहे, ते मी बोलणार.

अनुश्री : "अगं, प्रत्येक वेळी अशी तलवार काढून खेळायची गरज नसते.

रुचिता : अगं ए फुसके हे तुझे टॅक्टिक्स आता घराबाहेर चालव.

अनुश्री : बावळट, बिनडोक ... आणि हा वाद सुरूच राहिला ... 

हा वाद नेमका कशामुळे पेटला, दोघींमधील मतभेदांचा मूळ मुद्दा काय आहे आणि याचा घरातील इतर नात्यांवर काय परिणाम होणार, हे सगळं आजच्या भागात स्पष्ट होणार आहे. हा वाद पुढे आणखी वाढणार की यातून एखादा मोठा ट्विस्ट मिळणार, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये शिगेला पोहोचली आहे.