Bigg Boss Marathi 6 : गेल्या अनेक दिवसांपासून बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर नुकताच बिग बॉसचा ग्रँड प्रीमियर सोहळा पार पडला. बिग बॉसच्या घरात 17 स्पर्धक दाखल झाले आहेत. यंदा बिग बॉसच्या घरात शंभर दिवसांचा खेळ 17 स्पर्धकांसोबत रंगणार आहे. प्रत्येक दिवशी घरात जबरदस्त टास्क असणार आहेत. घरातील 800 खिडक्या 900 दारं कधीही आणि कुठेही उघडू शकतात आणि स्पर्धकांना धक्का मिळू शकतो अशी हिंट आधीच रितेश भाऊंनी स्पर्धकांना दिली होती. पण घरात आल्या आल्या पहिल्याच दिवशी स्पर्धकांच्या एका चुकीमुळे बिग बॉसचं दार बंद होणार आहे. नुकताच कलर्स मराठीने याचा पहिला प्रोमो शेअर केला आहे.
नेमकं घडलं काय घरात?
यंदा नशिबाचं दार उघडणार आणि नशिबाचा खेळ पालटणार अशी बिग बॉस मराठीची थीम आहे. त्यामुळे आल्या आल्या स्पर्धकांना दोन पैकी एका दाराची निवड करायची होती. यात 17 पैकी सहा स्पर्धकांनी शॉर्टकटच दार निवडलंय तर बाकीच्या स्पर्धकांनी मेहनतीचा मार्ग निवडला. दरम्यान पहिल्याच दिवशी घरातील सदस्यांनी बिग बॉसचा आदेश न ऐकल्यामुळे स्पर्धकांसाठी बिग बॉसचा दार बंद होणार आहे. या संदर्भात कलर्स वाहिनीने एक प्रोमो शेअर केलाय. बिग बॉस मराठीच्या घरात पहिलाच दिवशी तुफान येणार आहे.
घरातील मुख्य प्रवेशद्वाराजवळ एक बझर ठेवण्यात आला होता. तुफान येणार आहे असं बिग बॉसने सांगितल्यानंतरही एकाही स्पर्धकाने बझर वाजवला नाही. शेवटी बझरची मर्यादा संपली आणि बिग बॉसनं शिक्षा सुनावली. " कोणीच बझर वाजवून तुफान थांबवण्याचा प्रयत्न केला नाही त्यामुळे घर तुम्हा सर्वांसाठी बंद होतंय." असा आदेश बिग बॉसने दिला. पहिल्याच दिवशी स्पर्धकांना या शिक्षेमुळे झटका बसला आहे. सगळे स्पर्धक यावेळी गार्डन एरियामध्ये होते. त्यांच्या डोळ्यासमोर घर बंद केलं जातं. लिविंग एरियातील फ्लेक्स बंद होत असल्याचा प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. आता बिग बॉसचा पुढचा ट्विस्ट काय असेल याचा उलगडा आज रात्री 8 वाजता होणार आहे.