Tanya Mittal: बिग बॉस 19 हा सिझन प्रचंड चर्चेत राहिला होता. बिग बॉस 19मधील फायनलिस्ट तान्या मित्तल शोमधील तिच्या विधानांमुळे आणि दाव्यांमुळे चर्चेत आली होती. सलमान खानने स्वत: तिला अंतिम फेरीत सांगितले की, ती शोच्या इतिहासातील सर्वात चर्चेत असलेली स्पर्धक आहे. तान्या तिच्या संपत्ती आणि लाइफस्टाइलमुळे चर्चेत आली होती. तिनं केलेल्या दाव्यांवर कुणाचाच विश्वास बसत नव्हता. तिनं बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर एक व्हिडिओही शेअर केला होता. या व्हिडिओत तिच्या मालकीची कंडोम फॅक्टरी दिसत होती. तान्याने एका शोमधून एक वेगळाच खुलासा केला आहे. तिनं केलेल्या खुलाशामुळे तान्या पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे.
तान्याने स्वत: एका शोमध्ये म्हटलं की, तिनं कधीही इतकी मोठी सुरक्षा टीम असल्याचा दावा केला नव्हता, असं ती म्हणाल. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर तान्या तिच्या गावी परतली होती. अलिकडेच एका युट्यूब चॅनेलवरील व्हिडिओ मुलाखतीदरम्यान, तान्याने तिच्या कारखान्याची एक झलक शेअर केली. या शोच्या चर्चेदरम्यान तिनं 150 बॉडीगार्ड असण्याचा दावा खोटा असल्याचं सांगितलं. "मी असं कधीच म्हटलं नाही की, माझ्याकडे 150 बॉडीगार्ड आहेत. मी असं कोणत्याही मुलाखतीत किंवा शोमध्ये म्हटलेलं नाही. हे सर्व बनावट आहे. इंटरनेटवर तुम्हाला माझा 150 बॉडीगार्ड्स असल्याचे सांगणारा एकही व्हिडिओ सापडणार नाही. झीशान (कादरी) विनोद करत होता. मी त्याला सांगितले होते की, माझ्याकडे 150हून अधिक कर्मचारी आहेत. पण त्याने बॉडीगार्ड्स असल्याचा गैरसमज करून घेतला", असं स्पष्टीकरण तान्या मित्तल हिनं दिलं.
तान्याकडे पर्सनल सिक्युरिटी गार्ड्स
तान्या मित्तलकडे सध्या पर्सनल सिक्युरिटी गार्ड्स आहेत. परंतु, आतापर्यंत तिने कोणताही आकडा उघड केला नाही. तिच्या व्यवसायांबद्दल बोलताना तान्या म्हणाली, "माझ्याकडे सध्या टेक्सटाईल फॅक्टरी, एका फार्मा कंपनी आणि एक गिफ्ट फॅक्टरी आहे. मी याआधी कधीच खोटे बोलले नाही. पण मी तुम्हाला सगळं काही सांगूही शकत नाही", असं तान्या म्हणाली. "माझ्या करिअरमध्ये एक नवीन टप्पा आला आहे. मी अभिनेत्री झाले आहे. निर्माता एकता कपूर यांनी एक टेलिव्हिजन मालिकेची ऑफर दिलीये. सध्या मी माझ्या डाएटकडे लक्ष ठेवून आहे", असं तान्याने स्पष्ट केलं. दरम्यान, तान्या लवकरच एका मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ही मालिका नेमकी कोणत्या विषयावर आधारित असेल? या मालिकेत तान्या मित्तल मुख्य भूमिकेत असणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.