Bigg Boss Actor Accident: बिग बॉस 17 मधून प्रसिद्धी मिळालेला यूट्यूबर अनुराग डोभालचा (Anuraag  Dobhal) कार अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. UK07 Rider या त्याच्या इंस्टाग्रामवर लाईव्ह करत असतानाच त्याची कार डिव्हायडरला धडकल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात तो जबर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Continues below advertisement

इंस्टाग्राम लाईव्हदरम्यान घडला अपघात

मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात दिल्ली- मिरत महामार्गावर झाला. अनूराग कार चालवत असतानाच इंस्टाग्राम लाईव्हवर चाहत्यांशी बोलत होता. त्यावेळी त्याची गाडी वेगात असल्याचं सांगितलं जात आहे. काहींनी तो रडत असल्याचेही सांगितलं. काही क्षणांनंतर अचानक कारचा ताबा सुटला आणि ती डिव्हायडरला जाऊन धडकली. 

लाईव्ह स्ट्रीममध्ये अनूराग चाहत्यांशी संवाद साधताना दिसतो. काही सेकंदांतच जोरदार धक्का बसल्याचा आवाज येतो आणि लाईव्ह अचानक बंद होतं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत असून नेमकं काय घडलं असावं याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

Continues below advertisement

अपघातानंतर लोकांनी केली मदत

घटनेनंतर जवळील लोकांनी तातडीने मदत करत त्याला कारमधून बाहेर काढल्याचं दुसऱ्या व्हिडिओत दिसत आहे. त्या वेळी तो वेदनेत असल्याचं दिसतं. नंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र त्याच्या दुखापतीबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

या अपघातामागे नेमकं कारण काय आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. इंस्टाग्राम लाईव्हदरम्यान त्याने “हे कदाचित माझं शेवटचं व्हिडिओ असू शकतं” असा उल्लेख केल्याचंही काहींनी सांगितलं आहे. त्यामुळे त्याच्या मानसिक स्थितीबाबतही सोशल मीडियावर विविध चर्चा सुरू आहेत.

काही दिवसांपूर्वी कुटुंबावर केले होते गंभीर आरोप

विशेष म्हणजे हा अपघात घडण्याच्या तीन दिवस आधी अनूरागने यूट्यूबवर एक व्हिडिओ पोस्ट करून आपल्या कुटुंबावर गंभीर आरोप केले होते. त्याने सांगितलं होतं की आंतरजातीय विवाहानंतर आई-वडील आणि भावाकडून मानसिक छळ सहन करावा लागत आहे. त्याच्या मते, सुरुवातीला कुटुंबाने त्याच्या लग्नाला होकार दिला होता, मात्र लग्नाच्या काही दिवस आधी त्यांचा विरोध वाढला. लग्नानंतर त्याला आणि पत्नीला घरात प्रवेशही नाकारण्यात आल्याचा दावा त्याने केला होता.

सोशल मीडियावर चाहत्यांची चिंता

देहरादूनचा कंटेंट क्रिएटर असलेला अनूराग बाइकिंग व्हिडिओ आणि लाइफस्टाइल व्लॉग्समुळे लोकप्रिय झाला. Bigg Boss 17 मध्ये सहभागी झाल्यानंतर त्याची लोकप्रियता आणखी वाढली. अपघाताची बातमी समोर आल्यानंतर त्याच्या चाहत्यांना धक्का बसलाय.