मुंबई: मिस इंडिया रनर अप असलेली मान्या सिंह (Manya Singh) 'बिग बॉस 16' चा (Bigg Boss 16) एक भाग होती आणि तिला शेवटच्या एपिसोडमध्ये घरातून बाहेर काढण्यात आलं. पण घरातून बाहेर पडल्यानंतरही तिला सोशल मीडियामध्ये चांगलंच ट्रोल केलं जात आहे. मिस इंडिया स्पर्धा आणि आता बिग बॉसचं घर... असा प्रवास करणाऱ्या मान्या सिंहने तिच्यावर होणाऱ्या टीकेवर स्पष्टीकरण दिलं आहे. 


मान्या सिंह 2020 सालच्या मिस इंडिया स्पर्धेत रनर अप ठरली होती आणि त्यावेळी तिची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. त्यानंतर ती बिग बॉस 16 शोमध्ये मान्या सिंह तिच्या सहकाऱ्यांसोबत झालेल्या भांडणांमुळे चांगलीच चर्चेत आली होती. मान्या सिंहने या शोमध्ये अनेक सह-स्पर्धकांसोबत भांडण केलं आणि त्यावेळी ती 'मिस इंडिया'चा दराराही दाखवताना दिसली. दर वेळी मिस इंडियाच्या स्पर्धेतील तिच्या सहभागाबद्दर बोलताना ती इतरांना कमी लेखायची. त्यामुळे तिच्यामध्ये एक प्रकारचा अहंकार निर्माण झाला असल्याचं प्रेक्षकांना वाटू लागलं. त्यावर मान्या सिंहने स्पष्टीकरण दिलं. 


बिग बॉसच्या घरातील भांडणावर मान्याचं स्पष्टीकरण


बिग बॉसमधून बाहेर काढण्यात आलेल्या मान्या सिंहने 'बॉलिवूड लाईफ'शी संवाद साधताना सांगितलं की, "मिस इंडिया'चा टॅग वापरून मी भांडण करत नव्हती, तर त्याचं रक्षण करत होती. मी काय बोलत आहे हे लोकांना समजलं नाही. मी अहंकारी नाही, माझ्यात अहंकाराचा 'अ' सुद्धा नाही." 


मान्या सिंहने असंही सांगितलं की, तिला स्वतःची बाजू घेण्याचे, स्वत:साठी स्टॅंड घेण्याचे संस्कार मिळालेत आणि ती जे काही बोलली ते तिने 'मिस इंडिया' या खिताबाच्या सन्मानार्थ बोलले आहे. मान्या म्हणाली की, मला स्वतःची बाजू घेण्यासाठी उभं केलं गेलंय. जर कोणी तुमचा अपमान करत असेल तर त्यांचा अपमान करा. अशीच शिकवण मला मिळाली आहे. 


मान्याला दिवाळी स्पेशल एपिसोडमध्ये बाहेर काढण्यात आलं


बिग बॉसमध्ये मान्या सिंहचे अनेक स्पर्धकांसोबत भांडण झालं. प्रत्येक भांडणांमध्ये मान्या सिंह 'मिस इंडिया'च्या खिताबावर अहंकार दाखवताना दिसली आहे. तिने अभिनेत्री श्रीजिता डे हिला ‘तू फक्त एक टीव्ही अभिनेत्री आहे’ असं म्हणत तिची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मान्या सिंहला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आलं. 


मिस इंडिया रनर अप ठरल्यानंतर ती गर्विष्ठ झाली आहे, असंही काही लोक म्हणाले. परंतु मान्याची एक वेगळी बाजूही बिग बॉसमध्ये पाहायला मिळाली. ती जास्तीत जास्त वेळा बिग बॉसच्या घरात विना मेकअपचं दिसली. कदाचित तिला सामान्य मुलींमध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण करायचा असेल आणि त्यांना संदेश द्यायचा असेल की कुणीही सामान्य व्यक्ती मिस इंडियासाठी पात्र ठरु शकते.


मान्याचा प्रवास खडतर 


'फेमिना मिस इंडिया 2020' ची रनर अप मान्या सिंह हिचा इथवरच प्रवास सोपा नव्हता. तिच्या संघर्षाची कहाणी अनेकांना प्रेरणा देणारी आहे. मान्या सिंह उत्तर प्रदेशमधील गोरखपूरमधील आहे, मात्र मुंबईत लहानाची मोठी झाली. मान्याचे वडील मुंबईत रिक्षाचालक होते आणि जेव्हा मान्या लहान होती तेव्हा तिला घरात दोन वेळच्या जेवणासाठी संघर्ष करावा लागत होता. अशा परिस्थितीत मान्याला घरात अनेकदा इतर सदस्यांप्रमाणे उपाशी झोपावं लागत होतं.