Mumbai Session Court: बलात्काराच्या प्रत्येक प्रकरणात वैद्यकीय पुरावा आवश्यक आहेच असं नाही असं महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवत मुंबई सत्र न्यायालयानं पोक्सो प्रकरणातील आरोपीचा जामीन फेटाळून लावला आहे. आरोपी आणि अल्पवयीन मुलीच्या वयातील 31 वर्षांचं अंतर पाहता हे मोहामुळे दोन व्यक्तींमुळे प्रस्थापित झालेले संबंध हे प्रेमाचे वाटत नाहीत. याशिवाय आरोपी हा अनुभवी आणि प्रौढ आहे तर दुसरीकडे, पीडिताही अल्पवयीन आहे त्यामुळे यासंबंधांन मान्यताच मिळू शकत नाही. असं निरीक्षण नोंदवत बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत(पोक्सो) सत्र न्यायालयातील विशेष कोर्टानं सोशल मीडियावरील भेटीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या 45 वर्षीय आरोपीला जामीन देण्यास नकार दिला आहे.
आरोपीनं आपल्या प्रभावशाली व्यक्तीमत्वाची भूरळ पाडत एका अल्पवयीन मुलीला आपल्या जाळ्यात ओढलं. पीडितेनं याबाबत पोलिसांकडे नोंदलेला जबाब, मॅजिस्ट्रेटला दिलेलं निवेदन आणि तक्रारीत एकवाक्यता दिसून येत असल्यानं या गोष्टी आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा देण्यास पुरेशी आहे. बलात्काराच्या प्रत्येक प्रकरणात वैद्यकीय पुरावा आवश्यक आहेच असं नाही असं महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवत विशेष न्यायाधीश प्रीती कुमार घुले यांनी आरोपीला जामीन देण्यास नकार दिला.
काय आहे प्रकरण -
मुंबई राहणाऱ्या 14 वर्षीय पीडितेची 45 वर्षीय आरोपीशी फेसबूकच्या माध्यमातून ओळख झाली होती. त्यानं तिला एक फोनही भेट म्हणून दिला होता. मात्र त्यानं आपलं वय 25 वर्ष असल्याचं तिला सांगितलं होतं. सुरुवातीला एका बागेत भेटल्यानंतर ते दर आठवड्याला ते एकत्र बाहेर फिरू लागले. जानेवारी 2019 मध्ये पीडितेचे आईवडील घरी नसताना आरोपीनं घरी येऊन पीडितेला लग्नाचं आमीष दाखवून तिच्यावर जबरदस्ती केली.
पीडितेच्या शेजाऱ्यांनी पीडितेच्या कुटूंबियांना त्यांच्या अनुपस्थितीत एक व्यक्ती येऊन गेल्याची माहिती दिली. त्यावर तो आपला फेसबूक मित्र असल्याची मुलीनं माहिती दिली. मात्र त्यानंतर मुलीच्या स्वभावातील बदल, सतत फोनवर असणं, अभ्यासातील दुर्लक्ष पालकांच्या लक्षात आलं. त्याबाबत पीडितेला विचारणा केली असता ही धक्कादायक माहिती समोर आली. मात्र याबाबत कुठेही वाच्यता न करण्याची धमकीही त्यानं मुलीला दिली होती. त्यानंतर पालकांनी आरोपीविरोधात मुंबईतील आरसीएफ पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केल्यानंतर आरोपीला अटक केली. मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतर पीडितेनं वैद्यकीय तपासणी करण्यास नकार दिल्याची बाब आरोपीनं न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली होती, तसेच तिच्या जबाबातही विसंगती असल्याचा दावा केला होता.
आरोपींनी पीडितेला मोबाईल भेट देत, तिला फिरायला नेऊन मैत्री असल्याचं तिला पटवून दिलं आणि मग लग्नाचं आमिष दाखवून तिचा गैरफायदा घेतला. पीडित ही अल्पवयीन आहे तसेच आरोपी आणि तिच्या वयात खूप फरक आहे. ही बाब दुर्लक्षित करून चाहणार नाही, या निरीक्षणांच्या आधारे न्यायालयानं आरोपीना जामीन देण्यास नकार देत त्याची याचिका फेटाळून लावली.