Samar Hazarika Dies After Prolonged Illness: मनोरंजनसृष्टीतून एक दुख:द बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध गायक भूपेन हजारिका यांचे धाकटे भाऊ आणि सुप्रसिद्ध आसामी संगीतकार समर हजारिका यांचे मंगळवारी निधन झाले. वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही महिन्यांपासून ते आजारपणाशी झुंज देत होते, अशी माहिती कुटुंबियांनी दिली. नुकतेच त्यांना उपचारानंतर रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आले होते. दरम्यान, मंगळवारी त्यांची प्रकृती पुन्हा खालवली. त्यांचा या आजारपणातच मृत्यू झाला. त्यांच्या निधनानंतर सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.
समर हजारिका सर्वात लहान
समर हजारिका यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. समर हजारिका हे 10 भावंडांपैकी सर्वात लहान होते. त्यांच्या निधनानंतर आसामी संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. अनेक कलाकार आणि चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
कुटुंबाचा समृद्ध संगीत वारसा पुढे नेण्यात त्यांचा मोलाचा वाटा
समर हजारिका यांनी आपल्या कारकिर्दीत रेडिओ, अल्बम तसेच चित्रपटांसाठी असंख्य गाणी गायली, तसेच संगीतही दिले. कुटुंबाचा समृद्ध संगीत वारसा पुढे नेण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी विशेषत: आपल्या मोठ्या भावाचा भारतरत्न डॉ. भूपेन हजारिका यांचा वैचारिक आणि सांस्कृतिक वारसा पुढे नेला. संगीत विश्वात त्यांचे खूप मोठे योगदान आहे. संगीत विश्वातील दिग्गजांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
मुख्यमंत्र्यांकडून पोस्टद्वारे शोक व्यक्त
केवळ सिनेसृष्टी नाही तर, राजकीय वर्तुळातूनही त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी समर हजारिका यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलंय. त्यांनी ट्विटरमध्ये पोस्ट करून दुःख व्यक्त केलं आहे. "समर हजारिका यांच्या भावपूर्ण आवाजाने प्रत्येक प्रसंग उजळून निघाला होता. त्यांचे आसामच्या सांस्कृतिक आणि संगीत विश्वात खूप मोठे योगदान आहे. डॉ. भूपेन हजारिका यांचा समृद्ध वारसा पुढे नेण्यात समर हजारिका यांचा मोठा वाटा होता.
भूपेन हजारिकांची जन्मशताब्दी साजरी करण्याच्या आमच्या प्रयत्नांमध्येही त्यांचे अत्यंत मोलाचे योगदान होते", अशी भावना मुख्यमंत्र्यांनी पोस्टद्वारे व्यक्त केली. त्यांच्या निधनानंतर संगीत विश्वात एक पोकळी निर्माण झाली असल्याचं बोललं जात आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
'सैराट'चा परशा राजकीय मैदानात उतरणार? आकाश ठोसर लातूरच्या काँग्रेस रॅलीमध्ये, PHOTO व्हायरल