Bhumi Pednekars Lady Killer Fails at Box Office: मराठीतील असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी आपल्या टॅलेंटच्या जोरावर बॉलिवूडमध्ये वेगळं स्थान निर्माण केलं. भूमी पेडणेकरनं आपल्या पहिल्याच चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच छाप सोडली. तिनं आपल्या पहिल्या चित्रपटासाठी 30 किलो वजन वाढवलं होतं. तिनं आपल्या कारकिर्दीची सुरूवात कास्टिंग डायरेक्टर म्हणून केली होती. आज ती बॉलिवूडमधील टॉपची अभिनेत्री आहे. तिनं आपल्या कारकिर्दीत अनेक चढ उतार पाहिले. फ्लॉप चित्रपटामुळे ती प्रचंड चर्चेत आली होती. लेडी किलर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला. फक्त सिनेमागृहात नसून, ओटीटीवर देखील या चित्रपटाला जागा मिळाली नाही. तिनं अलिकडेच या चित्रपटाबाबत खुलासा केला आहे.
भूमी पेडणेकरचा क्राइम थ्रिलर दलदल ही वेब सिरीज नुकतीच रिलीज झाली. यात तिचा नवा अवतार पाहायला मिळाला. तिनं अलिकडेच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिनं करिअरमधील चढ उतारांबाबत माहिती दिली. तसेच लेडी किलर या चित्रपटाला मिळालेल्या अपयशाबद्दल भाष्य केलं. लेडी किलर हा सिनेमा चित्रपटगृहात जोरदार आपटला. हा चित्रपट भारतीय चित्रपट सृष्टीतील मोठ्या फ्लॉप सिनेमांपैकी एक ठरला. या सिनेमात भूमी पेडणेकर आणि अर्जून कपूर प्रमुख भूमिकेत होते.
लेडी किलरच्या अपयशाबद्दल बोलताना भूमी म्हणाली, "लेडी किलर फ्लॉप ठरला, तो काळ माझ्यासाठी खूपच कठीण होता. तेव्हा मला वाटलं, माझं करिअर आता संपलं आहे. या चित्रपटासाठी मोठी गुंतवणूक करण्यात आली होती. निर्मात्यांच्या मते, या चित्रपटाचं बजेट वाढल्यामुळे आणि पावसामुळे शूटिंग पूर्ण होऊ शकले नाही. अपूर्ण असलेला चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित करणे ही सर्वात मोठी चूक ठरली", असं भूमीनं स्पष्ट केलं. 'हा चित्रपट माझ्यासाठी धक्का नसून, धडा होता', असंही अभिनेत्री स्पष्ट केलं.
लेडी किलर हा सिनेमा चित्रपटगृहात सुपरफ्लॉप ठरला. या सिनेमाचं बजेट 45 कोटी इतकं होतं. मात्र, या सिनेमाची कमाई एक लाखच्या आसपास झाल्याची माहिती आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी या चित्रपटानं 38,000 रूपयांचा गल्ला जमवला. परंतु, हा सिनेमा प्रेक्षकवर्गाला थिएटरपर्यंत खेचण्यात अपयशी ठरला. त्यानंतर ओटीटी प्लॅटफॉर्मनं देखील या चित्रपटाला नाकारलं. युट्युबवर हा चित्रपट मोफत प्रदर्शित झाला.
