Bhonga Marathi Film : राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त 'भोंगा' (Bhonga) या चित्रपटाने चित्रपट प्रदर्शनापूर्वीच चांगलीच प्रसिद्धी मिळविली आहे. चित्रपटाच्या पोस्टरने सोशल मीडियावर प्रेक्षकांचेही लक्ष वेधून घेतले. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आहे. ध्वनी प्रदूषण कमी करण्यावर या चित्रपटात जोर दिला असून, यावर आधारित कथेवर 'भोंगा' हा चित्रपट चित्रित करण्यात आला. ‘धर्मापेक्षा मोठं कोणी नाही, मग कोणाच्या जीवाला धोका असला तरी चालेल’ अशा वृत्तीला दडपून टाकण्यासाठी सुरु असलेले गावकऱ्यांचे प्रयत्न या चित्रपटात दाखवण्यात आले आहेत.
'भोंगा धार्मिक नाही तर सामाजिक समस्या आहे' हा आशयघन विषय या 'भोंगा' चित्रपटातून 3 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट अमेय खोपकर, संदीप देशपांडे, आणि अमोल कागणे फिल्मस् प्रस्तुत असून, चित्रपटाची निर्मिती निर्माते, दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील, अर्जुन हिरामन महाजन, अमोल लक्ष्मण कागणे यांनी केली आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा राष्ट्रीयपुरस्कार विजेते दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी सांभाळली आहे.
पाहा ट्रेलर :
'भोंगा' चित्रपटाची कथा ही अजाणावर भाष्य करणारी आहे. एका कुटुंबातील चिमुकल्या बाळाला Hypoxic Ischemic Encephalopathy हा दूर्धर आजार झालेला असतो. अजानच्या भोंग्यामुळे या बाळाच्या तब्येतीवर आणखीन परिणाम होत जातो. बाळाला होणारा त्रास संपूर्ण गाव तर पाहतच असतो, हा त्रास थांबवण्यासाठी नेमके कोणते प्रयत्न केले जातात अथवा चित्रपटात नेमके काय घडते, या भोवती चित्रपटाचे कथानक फिरते.
या चित्रपटात अभिनेत्री दिप्ती धोत्रे, अभिनेता कपिल गडसुरकर, अमोल कागणे, श्रीपाद जोशी, आकाश घरत, दिलीप डोंबे, सुधाकर बिराजदार, अरुण गीते, महेंद्र तिसगे, रमेश भोळे, दिपाली कुलकर्णी या कलाकारांचा अभिनय पाहायला मिळणार आहे.
प्रदर्शनाआधीच कोरलंय पुरस्कारांवर नाव!
'भोंगा' या चित्रपटाला ‘फिल्मफेअर बेस्ट फिल्म क्रिटिक 2022’, ‘इंडिअन इंटरनॅशनल बेस्ट फिल्म’, ‘पुणे इंटरनॅशनल बेस्ट मराठी फिल्म’, महाराष्ट्र स्टेट अवॉर्डमध्ये ‘बेस्ट फिल्म’, ‘बेस्ट डिरेक्टर’, ‘सोशल फिल्म अँड स्टोरी’ हे पुरस्कार मिळाले आहेत.
हेही वाचा :
- Rashmika Mandanna : ‘जर्सी’च नाही, संजय लीला भन्साळींनाही दिलाय नकार! रश्मिकाने नाकारलेयत ‘हे’ ब्लॉकबस्टर चित्रपट!
- Lagan : ‘प्रेम निभावता आलं तर ते जिंकतं’, अभिनेत्री स्मिता तांबेच्या ‘लगन’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
- Ajay Devgn VS Kiccha Sudeep : 'हिंदी राष्ट्रभाषा नसेल तर तुमचे चित्रपट डब करून का रिलीज करता? किच्चा सुदीपच्या वक्तव्यावर अजय देवगणचे प्रत्युत्तर