Atishay Nirlajja Kande Pohe : कॉमेडियन समय रैनाचा (Samay Raina) इंडियाज गॉट लेटेन्ट (India's Got Latent) हा शो सध्या चांगलाच वादात सापडला आहे. यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाने (Ranveer Allahbadia) या कार्यक्रमात पालकांविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे हा शो सध्या चर्चेत आला आहे. या कार्यक्रमात वापरली जाणारी भाषा, हाताळले जाणारे विषय फारच आक्षेपार्ह, असभ्य आणि अश्लील असून या कार्यक्रमावर बंदी घालावी, अशी मागणी केली जात आहे. असे असतानाच भाडीपा या यूट्यूब चॅनेलने त्यांच्या 'अतिशय निर्लज्ज कांदेपोहे' या कार्यक्रमाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. या कार्यक्रमाचा 14 फेब्रुवारी रोजी होणारा शो पुढे ढकलण्यात आला आहे. 

14 फेब्रुवारीचा शो पुढे ढकलला

भाडिपाने याबाबतचा निर्णय सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर केला आहे. या निर्णयानुसार 14 फेब्रुवारी रोजी होणारा अतिशय निर्लज्ज कांदेपोहेचा शो पुढे ढकलण्यात आला आहे. सध्या वातावरण तापल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचही भाडिपाने म्हटलंय. 

भाडिपाच्या पोस्टमध्ये नेमकं काय आहे? 

'भाडिपाच्या फॅन्सना कळवण्यात वाईट वाटत आहे की, सध्या 'वातावरण तापल्यामुळे' 14 फेब्रुवारी रोजी होणारा अतिशय निर्लज्ज- कांदेपोहेचा शो आम्ही पोस्टपॉन करत आहोत. तसंही व्हॅलेन्टाईन्स डेला प्रोमोपेक्षा जास्त द्वेषच मिळतो. पण आमचं आमच्या फॅन्सवर प्रेमच आहे. आमच्या टॅलेन्टला आणि प्रेक्षकांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आहे,' असं  या पोस्टमध्ये सांगण्यात आलंय. 

तसेच, 'तिकिटांची रक्कम आगामी 15 दिवसांत तुमच्या बँक खात्यांवर जमा होईल रिफंडच्या पैशांतून स्वत:साठी काहीतरी छान गिफ्ट घ्या. आम्हाला माहिती आहे की आमच्या फॅन्सचंही आमच्यावर खूप प्रेम आहे आणि आमच्या स्टाईलची कॉमेडी तुम्हाला आवडते. म्हणूनच आमचा एक्स्क्लुझीव्ह कॉन्टेट बघण्यासाठी खास यूट्यूब मेंबरशीप चालू केली आहे. आम्ही अतिशय निर्लज्ज कांदोपोहेचे सर्व व्हिडीओज 18 पेक्षा जास्त वय असणाऱ्यांसाठीच पाहायला उपलब्ध करून दिले आहेत. तुम्ही तुमच्या कुटुंबासह आमच्या चॅनेलचा कंन्टेन्ट पाहू शकता,' असंही भाडिपाने सांगितलंय.

आमच्याकडून आम्ही पूर्ण प्रयत्न केला, पण..

विशेष म्हणजे अतिशय निर्लज्जपणे आमचा हा सभ्य शो लवकरच घेऊन येऊ. आमच्याकडून आम्ही पूर्ण प्रयत्न केला. पण तुमचा यंदाचाही व्हॅलेन्टाईन्स डे घरीच बसून जाणार, अशी विनोदी टिप्पणीही भाडिपाने केली आहे.

दरम्यान, यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाने इंडियाज गॉट लेटेन्ट या शोमध्ये पालकांविषयी केलेल्या विधानांनंतर आमच्याही शोवर कोणी आक्षेप घेऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून भाडिपाने हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जातंय. 

हेही वाचा :

रणवीर अलाहाबादिया, समय रैनाचा पाय आणखी खोलात, 'इंडियाज गॉट लेटेन्ट'वर बंदी घालण्याची मागणी!