Amitabh Bachchan Love Story: बॉलिवूडच्या (Bollywood News) काही गाजलेल्या लव्हस्टोरीबाबत (Amitabh Bacchan Love Story) चर्चा सुरू झाली की, अमिताभ (Amitabh Bachchan) आणि रेखा (Rekha) या जोडीचं नाव येतंच येतं. अमिताभ आणि रेखा यांच्या अधुऱ्या कहाणीबाबतचे अनेक किस्से आपल्याला माहितीयत. तसेच, अमिताभ बच्चन आणि जया बच्चन (Jaya Bachchan) यांच्या लग्नालाही 50 वर्षांहून जास्त वर्ष झालीत. 1971 मध्ये आलेल्या 'गुड्डी' चित्रपटाच्या सेटवर त्यांची पहिली भेट झाली होती, नंतर दोघांनी सातजन्माची गाठ बांधली. पण, तुम्हाला माहितीय का? रेखा, जया यांच्याआधीही अमिताभ बच्चन यांच्या आयु्ष्यात एक तरुणी होती.
सेलिब्रिटींचे किस्से लिहिणारे हनीफ झवेरी यांनी अलीकडेच एका मुलाखतीत बोलताना अमिताभ बच्चन यांच्या कुणालाही माहीत नसलेल्या लव्ह स्टोरीचा खुलासा केला आहे. अमिताभ बच्चन आणि त्यांच्या पहिल्या प्रेमाची आणि त्यानंतर झालेल्या ब्रेकअपची कहाणी सांगितली आहे. अमिताभ बच्चन मुंबईत येण्यापूर्वीच दोघांचं सूत जुळलं होतं, पण, बिग बींचा पहिला सिनेमा 'सात हिंदुस्तानी' प्रदर्शित होण्यापूर्वीच ब्रेकअप झालं.
'मेरी सहेली' या युट्यूब चॅनलना दिलेल्या मुलाखतीत बोलताना हनीफ झवेरी यांनी सांगितलं की, "माया नावाच्या महिलेसोबत अमिताभ यांचं सूत जुळलं होतं. त्यावेळी बिग बी कोलकातामध्ये राहायचे आणि तिथे काम करत असताना ते दरमहा तब्बल 250-300 रुपये प्रति महिना कमवायचे. हनीफ यांनी सांगितलं की, त्यावेळी ती ब्रिटिश एअरवेजमध्ये काम करायची. अमिताभ बच्चन यांचा तिच्यावर फार जीव होता आणि तीसुद्धा बिग बींच्या आकंठ प्रेमात बुडालेली..."
अमिताभ बच्चन यांची पहिली गर्लफ्रेंड कोण?
हनीफ झवेरी यांनी पुढे बोलताना सांगितलं की, कोलकात्यातील नोकरीनंतर अमिताभ बच्चन चित्रपटांमध्ये कामाच्या शोधात मुंबईत आले आणि सुरुवातीला जुहू इथल्या एका बंगल्यात राहत होते, जो त्याच्या आई तेजी बच्चनच्या एका मित्राचा होता. माया अनेकदा तिथे त्यांना भेटायला यायची. त्याच बंगल्यात अमिताभ बच्चन यांच्या आईचा मित्रही राहायचा, त्यामुळे बिग बींना माया सोबतच्या त्यांच्या रिलेशनबाबत त्यांच्या आईला कळेल, याची भिती वाटायची. म्हणून त्यांनी तो बंगला सोडण्याचा निर्णय घेतला.
बिंग बींनी घर बदलून टाकलं...
ज्यावेळी अमिताभ बच्चन यांनी घर बदलण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी ते त्यांचा पहिला सिनेमा 'सात हिंदुस्तानी'वर काम करत होते. त्यावेळी ते मेहमूद यांचा भाऊ अन्वर अलीसोबत काम करत होते. त्यांनी त्यांच्या सर्व व्यथा, चिंता अन्वरला सांगितल्या, त्यानं ते समजून घेऊन स्वतःच्या घरात राहण्यासाठी जागा दिली. अन्वरने मेहमूदकडून एक अपार्टमेंट घेतले होते आणि अमिताभ काही काळ या घरात राहत होते, असं हनीफ झवेरी यांनी सांगितलं.
एकदा सर्वांसमोर मायानं बिग बींना सुनावलेलं
हनीफ झवेरी यांनी सांगितलं की, बिग बी आणि माया काही काळ एकत्र राहिले असते, तर पुढे कदाचित दोघांचं लग्न झालं असतं, पण त्यावेळी अमिताभ यांची कारकीर्द स्थिर नव्हती. त्या काळात अमिताभ खूप लाजाळू व्यक्ती होते आणि माया खूप हुशार, चुनचुनीत होती. कधीकधी तर बिग बींसोबत कुणी आहे, याचंही भान तिला राहायचं नाही, ती तिला वाट्टेल तसं बिग बींसोबत बोलायची, त्यांना उलट-सुलट बोलायची. अन्वर अली आणि अमिताभ यांच्या इतर मित्रांना हे अजिबात आवडायचं नाही.
...अन् एक दिवस अमिताभ-मायाचं ब्रेकअप
हनीफ झवेरी यांनी पुढे बोलताना सांगितलं की, जेव्हा अमिताभ गोव्यात 'सात हिंदुस्थानी' सिनेमाची शुटिंग करत होते, त्यावेळी अमिताभ बच्चन यांना त्यांनी मायासोबतचं नातं तोडायला सांगितलं होतं. त्यांना वाटायचं की, माया बच्चन कुटुंबात फिट बसणार नाही आणि जर अमिताभ फिल्म्समध्ये पुढे जात होते, त्यामुळे मायामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या असत्या. अखेर एक दिवस अमिताभ बच्चन आणि माया यांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि दोघांचा ब्रेकअप झाला. " दरम्यान, अमिताभ बच्चन यांचा पहिला सिनेमा 1969 मध्ये रिलीज करण्यात आला. त्यांनी 1973 मध्ये जया बच्चन यांच्याशी लग्नगाठ बांधली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :