Bappi Lahiri classic : चीनमध्ये कोरोनाची स्थिती पुन्हा एकदा गंभीर झाली आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमिवर चीनमध्ये कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय. त्यामुळे लोकांची उपासमार होता आहेत. ही भयानक परिस्थीती दाखवण्यासाठी चीन मध्ये लोक हातात रिकामी भांडी घेऊन सरकारचा निषेध नोंदवत आहेत. यावेळी हे लोक चीनच्या भाषेत 'जी मी, जी मी' म्हणजे 'मला तांदूळ दे, मला तांदूळ दे' असे म्हणत व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत. त्यामुळे चीनमध्ये बप्पी लाहिरी यांच्या 'जिम्मी जिमी' गाण्याने धुमाकूळ गातला आहे.  


वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमिवर चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे.  कोविड पॉझिटिव्ह कोण आढळले तर त्याला क्वारंटाइन सेंटरमध्ये हलवले जात आहे. या धोरणासह चीनमध्ये कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. परंतु, या लॉकडाऊनमुळे अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. त्यामुळे तेथील नागरिक नाराज असून व्हिडीओच्या माध्यमातून सरकारचा निषेध नोंदवत आहेत.     


अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा 1989 मध्ये आलेला 'डिस्को डान्सर' हा चित्रपट प्रचंड गाजला होता. आजही या चित्रपटाची गणना हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठित चित्रपटांमध्ये केली जाते. चित्रपटाची कथा, मिथुन चक्रवर्तींचा अभिनय, नृत्य आणि पडद्यावरची नवीन शैली, सर्व काही खूप गाजले. चित्रपटातील बप्पी लाहिरी यांनी संगीतबद्ध केलेली गाणी आजही लोकांना आवडतात. पण अचानक 'डिस्को डान्सर'च्या   लोकप्रिय  'जिम्मी जिमी'  गाण्याला चीनमधून फॉलोअर्स  वाढले आहेत.  




चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून सरकारच्या कठोर कोरोना नियमांना मोठा विरोध होत आहे. मात्र दुसरीकडे जनतेच्या या विरोधावर मोठ्या प्रमाणात कारवाईही केली जात आहे. कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना सोशल मीडियावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. सरकारच्या नियमांना विरोध करणारे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सेन्सॉर केले जात आहेत. पण आता जनतेने एक स्मार्ट मार्ग शोधून काढला आहे. 'जिमी जिमी' हे गाणं गात रिकामी भांडी हाती घेत सरकारचा निषेध नोंदवित आहे. जिमी जिमी' हे गाणं म्हटलेले व्हिडिओने सध्या तरी चिनी सेन्सॉरपासून दूर आहेत. 


लॉकडाऊनचा निषेध करणाऱ्या लोकांवर कारवाई 
सुरक्षा अधिकारी लॉकडाऊनचा निषेध करणाऱ्या लोकांवर कारवाई करत आहेत. या कारवाईचे शेकडो व्हिडिओ आतापर्यंत समोर आले आहेत. परंतु, आता लोक गाण्याचा आधार घेत  'जिम्मी जिमी' गाण्यातून सरकारचा निषेध करत आहेत.