Badlapur Case : बदलापूर पूर्व मधील एका नामांकित शाळेत दोन चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणानं आज अख्खा महाराष्ट्र हादरला आहे. या अत्याचाराविरोधात बदलापूरकरांनी आंदोलनाच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला आहे. सकाळी 6.30 वाजल्यापासून शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ सुरू झालेल्या आंदोलनाने संपूर्ण शहरभरात पेट घेतला. आरोपींना फाशीची मागणी आंदोलकांनी केली आहे. मराठी सिनेइंडस्ट्रीमधूनही या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबने (Shivali Parab) ही फाशीच्या शिक्षेची मागणी केली आहे.
बदलापूर पूर्व येथील एका नामांकित शाळेत दोन चिमूरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार झाल्यानंतर पालकांचा उद्रेक झाला आहे. संतापलेल्या पालकांनी आज शाळेबाहेर जोरदार आंदोलन केले. त्यानंतर आंदोलकांच्या संतप्त जमावाने बदलापूर रेल्वे ट्रॅकवर जात रेल रोको आंदोलन केले. आंदोलनाची धग तीव्र होत गेल्याने प्रशासनही खडबडून जागे झाले.
चिमुरडींवरील अत्याचाराने सगळेच हादरले आहेत. मराठी अभिनेत्री शिवाली परबने इन्स्टाग्रामवर आपल्या स्टोरीमध्ये या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. बलात्काऱ्यांना फाशीच्या शिक्षेची मागणी शिवालीने केली आहे.
एका मुलीची आई म्हणून जीव....
मराठी अभिनेत्री सुरभी भावे हिनेदेखील या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. सुरभीने इन्स्टाग्राम स्टोरीमधून एक पोस्ट शेअर केली आहे. तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, "बदलापूरमध्ये साडेतीन वर्षांच्या दोन मुलींवर त्यांच्या शाळेत लैंगिक अत्याचार...एका मुलीची आई म्हणून दररोज जीव टांगणीला लागेल असा प्रसंग!! माणुसकीचा अंत होत आहे हे निश्चित...त्या पालकांवर काय प्रसंग ओढवला असेल याची कल्पना सुद्धा करवत नाहीये...कधी अश्या आरोपींना डायरेक्ट मृत्यूची शिक्षा होईल या देशात देव जाणे", असं सुरभीने म्हटले आहे.
दरम्यान, याप्रकरणी शाळेतील संबंधित मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आलं असून मुलांची जबाबदारी असलेल्या दोन सेविकांना सेवेतून कमी करण्यात आलं आहे. सजग नागरिकांकडून शाळेविरुद्ध आंदोलन करण्यात येत आहे. आता प्रशासनाकडून याप्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे.
नेमकं काय घडलं?
बदलापूरमधील एका शाळेत आरोपी अक्षय शिंदे 1 ऑगस्ट रोजी कंत्राटी पद्धतीनं कामावर रूजू झाला होता. मुलींच्या स्वच्छतागृहांची सफाई करणाऱ्या आरोपीनं त्याच्या कामाचाच गैरफायदा घेतला. या हैवानानं याच बहाण्यानं चिमुकल्यांचा गैरफायदा घेतला. दरम्यान, शाळेनं मुलींच्या स्वच्छतागृहांच्या सफाईसाठी शाळेनं महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली नाही.
पीडित एक चिमुकली चार वर्षांची, तर दुसरी सहा वर्षांची असल्याची माहिती आहे. शाळेत नुकत्याच सफाई कामगार म्हणून रूजू झालेल्या अक्षय शिंदे नावाच्या 23 वर्षांच्या नराधमानं चिमुकल्यांच्या अजाणतेपणाचा फायदा घेऊन त्यांच्यासोबत पाशवी कृत्य केलं. ही घटना 12 ऑगस्टची आहे. त्या दिवशी सकाळचे वर्ग सुरू असताना घडली.
12 ऑगस्टच्या दिवशी एका मुलीनं शाळेतून घरी परतल्यानंतर तिच्या पालकांकडे तक्रार केली. आई मला शुच्या जागी मुंग्या चावतायत, असं चिमुकलीचं वाक्य होतं. तिला समजलंही नव्हतं की, तिच्यासोबत काय घडलंय... सातत्यानं मुलीनं पालकांकडे तक्रार केल्यानं पालकांना संशय आला. त्यांनी मुलीला विश्वासात घेऊन विचारणा केली, त्यावेळी प्रकार उघडकीस आला. शौचालयात गेली असता अक्षय शिंदे नावाच्या नराधमानं तिच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श केल्याचं उघड झालं. चिंतेत असलेल्या पालकांनी त्याच वर्गातील दुसऱ्या मुलीच्या पालकांशी संपर्क साधला. नुकतीच त्यांची मुलगीही शाळेत जायला घाबरत असल्याचं त्यांना समजलं. दोन्ही मुलींची अवस्था संशयास्पद वाटल्यानं पालकांनी तात्काळ स्थानिक डॉक्टरांकडे तपासणी करण्याचं ठरवलं. तपासणीनंतर ज्या नराधमानं त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचं उघडकीस आलं.