मुंबई : अवधूत गुप्ते हा गुणी कलाकार मराठी सिनेसृष्टीला लाभला आहे. तो उत्तम संगीतकार आहेच. शिवाय तो उत्तम गातो हे आपण सगळेच जाणतो. कारण, अवधूत गुप्ते संगीतकार, गायक यांसोबत तो निर्माता, दिग्दर्शकही आहे. अनेक नव्या गोष्टी तो सातत्याने करत असतो. त्याने सुरूवातील आणलेला जय जय महाराष्ट्र माझा.. हे गाणं असू दे किंवा मनमोराचा कसा पिसारा फुलला.. हे गाणं असू दे. त्याने नेहमीच हट के प्रयोग केले. लोकांना ते भावले.


अवधूतने केलेल्या प्रयोगावर दुहेरी सूर उमटत होते. काहींना त्याचे हे प्रयोग रुचले नाहीतही. पण तरीही अवधूत सतत काहीतरी नवं काम करत होता. काही वर्षांपूर्वी त्याने खुपते तिथे गुप्ते यासारखा शोही आणला. ज्यात त्याने लोकांना अनेक प्रश्न विचारले. लोकांच्या मुलाखती घेतल्या. तो कार्यक्रमही गाजला. पण अवधूत गुप्ते यांना नेमकं काय खुपतं ते मात्र काही केल्या कळत नव्हतं. पण आता मात्र त्याचं उत्तर मिळालं आहे. अवधूत गुप्ते यांनी आपल्याल खुपत असलेली गोष्ट आता लोकांसमोर आणण्याचा विडा उचलला आहे. त्यासाठीही त्याने माध्यम निवडलं आहे ते गाण्याचं. अवधूत गुप्ते एक नवं रॅप सॉंग आणतो आहे. विशेष म्हणजे हे गाणं त्याने गायलं असलं तरी संगीत मात्र त्याचं नाहीय. काहीतरी हट के करायच्या हेतून त्याने हे गाणं केलं हे खरं आहे. पण असं असलं तरी त्यातून काहीतरी मेसेज द्यायचा प्रयत्न त्याने केलं आहे. या गाण्याचं नाव आहे 'जात'. एकीकडे जातीपातीच्या राजकारणाने उसळी खाल्लेली असतानाच दुसरीकडे अवधूत आपल्या गाण्यातून जातीबद्दल काहीतरी विशेष बोलणार आहे.


अवधूत गुप्ते आपल्या रॅप सॉंगमधून जातीबद्दल बोलणार आहे. याची गीतरचना समीर सामंत यांची असून संगीत दिलं आहे विक्रम बाम यांनी. या आपल्या नव्या गाण्याबद्दल बोलताना अवधूत म्हणाला, मी बरेच वेगवेगळे प्रकार हाताळले पण मी रॅप कधी केला नव्हता. हा प्रकार मला करायचा होता. म्हणून मी हे गाणं करायचं ठरवलं. त्यातही हे गाणं करताना त्याचं फक्त रंजन न करता काहीतरी समाजाला सांगावं असंही वाटून गेलं. म्हणून जात हा विषय घेतला. मला यात कोणत्याही जातीचा अवमान करायचा नाही. कारण सगळ्याच जातीचा आदर आहे. पण या सगळ्या पलिकडे मला माणुसकीची जात महत्वाची वाटते. ती आपण सगळ्यांनी जपली पाहिजे असं अवधूत म्हणतो.


अवधूत गुप्तेने या गाण्यातून आपल्या मनातल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. हे गाणं आता लवकरच लोकांसमोर येणार आहे. त्यानंतर त्याला कसा प्रतिसाद मिळतो ते पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे. अवधूत गुप्ते याने अनेक उत्तमोत्तम गाणी मराठी संगीतविश्वाला दिली आहेत. शिवाय अनेक चित्रपटांचं दिग्दर्शनही केलं आङे. नवनवी गाणी देतानाच काहीतरी वेगळं देण्याची त्याची धडपडच त्याच्यात असलेल्या कलाकाराला जिवंत ठेवते. आता अवधूत आणखी एक काहीतरी नवं घेऊन आला आहे. लोकांना ते आवडेल अशी खात्री त्याला वाटते.