मुंबई: वैशिष्ट्यपूर्ण अभिनय, विनोदाची उत्तम जाण आणि पडद्यावरील उत्साहपूर्ण देहबोली या गुणांच्या जोरावर मराठी रंगभूमी, चित्रपट आणि छोट्या पडद्यावर आपली छाप उमटवणारा हरहुन्ररी अभिनेते अतुल परचुरे यांचे सोमवारी मुंबईत निधन झाले. ते 57 वर्षांचे होते. अतुल परचुरे (Atul Parchure Death) यांना काही महिन्यांपूर्वी कर्करोगाने ग्रासले होते. मात्र, दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर आणि सुहृदांच्या साथीने अतुल परचुरे यांनी कर्करोगावर (Cancer disease) मात करुन नव्या इनिंगला सुरुवात केली होती. मात्र, दोन-तीन दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती बिघडली होती. यानंतर त्यांची प्रकृती खालावत गेली. सोमवारी संध्याकाळी अचानक अतुल परचुरे यांच्या निधनाची बातमी येऊन धडकल्याने अनेकांना धक्का बसला.
अतुल परचुरे यांच्या 'वासूची सासु', 'प्रियतमा', 'तरुण तुर्क म्हातारे अर्क' या नाटकांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या होत्या. अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटातही त्यांनी अभिनय केला होता. सलाम-ए-इश्क', 'पार्टनर', 'ऑल द बेस्ट: फन बिगिन्स', 'खट्टा मीठा', 'बुढ्ढा होगा तेरा बाप' अशा हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी स्वतःच्या अभिनयाची छाप पाडली होती. तर छोट्या पडद्यावरील जागो मोहन प्यारे' मालिकेतील अतुल परचुरे यांची भूमिका चांगलीच लोकप्रिय ठरली होती. 'अलीबाबा आणि चाळीशीले चोर' हा त्यांचा प्रदर्शित झालेला शेवटचा मराठी चित्रपट होता.
'आता मला कसलं सरप्राईज वाटणार नाही'
अतुल परचुरे यांनी कर्करोगावर मात केल्यानंतर 'मित्र म्हणे' या पॉडकास्टमध्ये आजाराच्या काळातील आपले अनुभव मांडले होते. या मुलाखतीमध्ये अतुल परचुरे यांनी भविष्यात अनेक गोष्टी करण्याचा मनोदय व्यक्त केला होता. कर्करोगावर मात केल्यानंतर आता तुम्हाला काय वाटते, असा प्रश्न अतुल परचुरे यांना विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना अतुल यांनी म्हटले होते की, आता मला कसलं सरप्राईज वाटणार नाही किंवा मला कसला ट्रॉमा येणार नाही. मला आता पुढे काहीही झालं, तरी मी त्यासाठी तयार आहे. मला ठाम विश्वास आहे की, मला आता पुढे काही होणार नाही. फक्त शेवटी काय व्हायचं ते होईल. मला इथून पुढे सगळं चांगलं दिसतंय. मी आता नव्याने आयुष्याकडे बघतोय. आता मी मनाला वाटेल तेवढंच काम करणार आहे. येणारा काळ माझ्यासाठी चांगला असेल, असे अतुल परचुरे यांनी म्हटले होते. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळेच होते आणि त्यामुळे अतुल परचुरे यांच्या जीवनाचा प्रवास अचानक थांबला.
कॅन्सर झाल्यावर खिडकीतून सी लिंक आणि सिद्धिविनायकाचं देऊळ पाहत बसायचो: अतुल परचुरे
अतुल परचुरे यांनी मुलाखतीत कर्करोग झाल्यानंतरचे आपले सुरुवातीचे दिवस कसे होते, याबद्दल सांगितले होते. अतुल परचुरे यांनी म्हटले की,सुरुवातीच्या काळात प्रत्येक दिवस आधीच्या दिवसापेक्षा वाईट होता. तेव्हा माझा पाय खूप सुजला होता. सूज ओसरत नव्हती. मला साधा स्टुलवर पाय उचलून ठेवायचा दुसऱ्या व्यक्तीची मदत लागायची. मी एका खोलीतून दुसऱ्या खोलीत चालत गेलो तरी माझ्या मित्रांना ती खूप मोठी अचिव्हमेंट वाटायची, अशी माझी अवस्था होती.
पुढे त्यांनी म्हटलं की, त्या काळात मी रात्री 11 वाजता झोपलो की, मला लगेच सव्वा अकराला जाग यायची. नंतर मी पूर्ण रात्र जागाच असायचो. मग मी घराच्या खिडकीतून सी लिंक बघ, सिद्धिविनायक मंदिर आणि रस्त्यावरील ट्रॅफिक बघत बसायचो. नंतरनंतर एक वेळ अशी आली होती की, मला डोळे उघडले तरी किती वाजले कळायचे, इतका मला ट्रॅफिकचा आवाज परिचयाचा झाला होता. 12 वाजता ट्रॅफिकचा आवाज कसा यायचा, एक वाजता कसा यायचा, दोन वाजता कसा यायचा, तीन वाजता ट्रॅफिकचा आवाज कसा यायचा, हे मला कळायचे, अशी आठवण अतुल परचुरे यांनी सांगितली होती.