Atharva Sudame Apologized: प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर (Social Media Influencer) अथर्व सुदामे (Atharva Sudame) सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav 2025) पार्श्वभूमीवर अथर्व सुदामेनं एक व्हिडीओ केला होता. हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश देणारा एक रिल अथर्व सुदामेनं (Atharva Sudame Reel) तयार केला होता. पण, नेमका याच रिलवरुन मोठा वाद उफाळला आहे. अथर्व सुदामेला प्रचंड ट्रोल केलं जातंय. एवढा की, अथर्वला त्याचं रिल डिलीट करावं लागलं. एवढंच काय तर, आपल्या रिलवरुन अथर्व सुदामेनं माफीही मागितली आहे.
सोशल मीडिया स्टार अथर्व सुदामेनं ट्रोल झाल्यानंतर व्हिडीओ डिलीट केला आहे. हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश देणारा रील त्यानं बनवला होता. मात्र त्याला ट्रोल करण्यासोबतच धमक्या आणि शिव्या देखील दिल्या होत्या. या नंतर त्यानं हा रील डिलीट केला आहे. तसंच कुणी दुखावलं असेल तर माफी मागतो, असं अर्थव सुदामे म्हणाला आहे.
अथर्व सुदामेचा व्हिडीओ नेमका काय?
प्रसिद्ध सोशल मीडिया स्टार अथर्व सुदामे सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. त्यासाठी कारण ठरलंय, त्याचं एक रिला. गणेशोत्सवाच्या निमित्तानं अथर्व सुदामेनं एक रिल शेअर केलं आहे. या रिलमध्ये अथर्व सुदामे एका भाविकाच्या भूमिकेत दिसतोय. अथर्व गणेशोत्सवासाठी गणरायाची मूर्ती खरेदी करण्यासाठी मूर्तीकाराकडे जातो. मूर्तीकाराच्या कारखान्यात असंख्य मूर्ती असतात. त्यातली एक मूर्ती अथर्व बूक करतो. तेवढ्यात मूर्तीकाराचा मुलगा अब्बू अशी हाक मारत तिथे येतो. तेवढ्या अथर्व सुदामे आणि तो मूर्तीकार एकमेकांकडे पाहतात. तेवढ्यात मूर्तीकार अथर्वला सांगतो की, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पुढे जाऊन मूर्ती पाहू शकता... मूर्तीकाराला वाटतं की, अथर्व सुदामे मूर्ती खरेदी करेल की नाही? पण, अथर्व सुदामे तुमच्याकडूनच मूर्ती घ्यायची आहे, असं मूर्तीकाराला निक्षूण सांगतो.
अथर्व सुदामे मूर्तीकाराशी बोलताना म्हणतो की, "माझे वडील सांगतात की, आपण साखर व्हावं जी खीरही बनवते आणि शीरखुर्माही... तसेच आपण वीट व्हावं जी वीट देवाळातही लावली जाते आणि मशिदीमध्ये देखील..." असा संवाद या रीलच्या शेवटी अर्थवच्या तोंडी देण्यात आला आहे. या रीलवरुन अथर्व सुदामेवर हिंदुत्वाद्यांकडून टीका होत आहे.
ब्राह्मण महासंघाची अथर्व सुदामेवर आगपाखड
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामेनं हिंदू-मुस्लिम धर्माचं ऐक्य दर्शवणारं रिल शेअर केलेलं. यावरुन मोठा वाद झाला. अथर्वला ट्रोल केलं जाऊ लागलं. त्यानंतर अथर्वला शिव्या, धमक्या देण्यात आल्या. आता सुदामेच्या रिलसंदर्भातल्या वादात आता ब्राह्मण महासंघाने उडी घेतली आहे. ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी आनंद दवे यांनी या विषयावर बोलताना सुदामेने केवळ मोनरंजन करावं, अभ्यास नसलेल्या विषयाबद्दल बोलू नये, असं सांगितलं आहे.
"अर्थव सुदामेचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय. त्यामध्ये तो हिंदू-मुस्लिम ऐक्याची काहीतरी अक्कल शिकवतोय. आमचं एवढंच म्हणणं आहे की तू करमणूक कर, लोकांना हसव आणि स्वत:चं पोटभर! यापेक्षा वेगळ्या काही अभ्यास नसलेल्या गोष्टीत पडू नकोस," असा सल्ला दवेंनी दिला आहे.
"दुधात टाकलेली साखर हे साखरेचं काम करतेय की विषाचं काम करतेय हे गेली 700-800 वर्ष हिंदू भोगतोय! हिंदूंनी भोगलेलं आहे. त्यामुळे हिंदू-मुस्लिम ऐक्य, गणपती कसे बसवायचे? कोणाकडून घ्यायचे हा तुझा विषय नाहीये. तू त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस. हिंदूंना कळतं कोणाकडून काय घ्यायचं, कसं घ्यायचं, कधी घ्यायचं. तू फक्त तुझा करमणुकीचा धंदा कर आणि तेवढ्यापुरता तुझा धंदा मर्यादित ठेव...", असंही दवेंनी अर्थव सुदामेला सुनावताना म्हटलं आहे.
अथर्व सुदामेच्या रिलवरुन नेटकऱ्यांमध्येही दुमत
सोशल मीडियावर अथर्व सुदामेला ट्रोल केलं जात आहे. पण, एक गट आहे जो अथर्व सुदामेची बाजूही घेत आहे. अथर्व सुदामेचं काहीच चुकलं नाही, एवढी आगपाखड करण्यासारखं त्या व्हिडीओमध्ये काहीच नाही, असं अनेकांचं म्हणणं आहे. तसेच, अथर्वनं माफी मागितल्यानंतरही माफी मागण्याची गरज नाही, असंही अनेकजण अथर्व सुदामेला सांगत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :