Ashish Shelar ND Studio: बॉलिवूड सिनेइंडस्ट्रीतील दिवंगत कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांच्या मृत्यूनंतर एन. डी. स्टुडिओबाबत (N.D Studio) प्रश्नचिन्ह उपस्थित झाला होता. नितिन देसाईंच्या एन. डी. स्टुडिओचा शासनाने यापूर्वीच ताबा घेतला होता.  आता या स्टुडिओच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांस्कृतिक कार्यमंत्री आणि भाजप नेते ॲड. आशिष शेलार  यांनी सोमवारी स्विकारली.  यानंतर रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळांतर्गत  एन.डी. स्टुडिओच्या  संचालक मंडळाची सोमवारी बैठक पार पडली. तसेच यावेळी मोठी घोषणाही करण्यात आली.  स्टुडिओमध्ये शूटिंग आणि अन्य बाबींसाठी 50 टक्के सवलतीची घोषणा राज्य  शासनाने केली.  फिल्ममेकर्ससाठी नक्कीच ही आनंदाची बाब म्हणता येईल.

Continues below advertisement

एनडी स्टुडिओमध्ये शूटिंग करण्यास 50 टक्के सवलत (Ashish Shelar takes charge as chairman of N.D. Studios)

कर्जतच्या खालापूर येथील एन.डी. स्टुडिओमध्ये शूटिंग आणि अन्य बाबींसाठी 50 टक्के सवलतीची घोषणा राज्य शासनाने केली. राज्य शासनाने ताब्यात घेतलेल्या एन.डी. स्टुडिओच्या अध्यक्षपदाचा पदभार सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांनी आज स्वीकारला. त्यानंतर स्टुडिओच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत चित्रपट निर्मितीला अधिक चालना देणे, निर्मात्यांसाठी चित्रीकरणाचा खर्च कमी करणे आणि एन.डी. स्टुडिओचा प्रभावीपणे विकास करणे यादृष्टीने बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रज्ञांना अधिक अनुकूल वातावरण उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने 31 मार्च 2027 पर्यंत चित्रीकरण आणि अन्य गोष्टींमध्ये 50 टक्के सवलत दिली जाणार, अशी घोषणा त्यांनी केली.

Continues below advertisement

कोणत्या गोष्टींवर सवलत लागू?

एन.डी. स्टुडिओतील थीम पार्कचे प्रवेश शुल्क.

चित्रीकरणासाठी येणारे निर्माते, कलाकार, कलादिग्दर्शक आणि इतर मान्यवरांसाठी उपलब्ध निवास व्यवस्था.

सांस्कृतिक पर्यटनालाही प्रोत्साहन.

महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे आणि सर्वसमावेशक चित्रपट निर्मिती केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने, पुढील काळात विविध उपक्रम राबविण्याचे संकेतही या बैठकीत देण्यात आले.

सांस्कृतिक कार्यमंत्री आणि भाजप नेते ॲड. आशिष शेलार यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.  प्रसार माध्यमांशी बोलताना आशिष शेलार म्हणाले की, 'आपले नितिन देसाई यांच्या दुर्देवी मृ्त्यूनंतर स्टुडिओवरील कर्ज आणि सुविधा याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्या नेतृत्वात  एक निर्णय घेतला आहे. सर्व आर्थिक देणी देऊन सरकारने या स्टुडिओची मालकी घेतली आहे. या स्टुडिओच्याबाबतीत आर्थिक घडी व्यवस्थित करुन, चांगली व्यवस्था सुरु करण्यात आली आहे'.

'राज्याच्या सिनेसृष्टीला अधिक सक्षम व्यासपीठ उपलब्ध करुन देणे,  महाराष्ट्रात  मोठ्या प्रमाणावर चित्रिकरण आणणे आणि त्यातून स्थानिक कलाकार, कामगार तसेच सेवा क्षेत्रांना रोजगाराच्या संधी उपलब्ध  करुन देणे, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे. एन.डी स्टुडिओमध्ये चित्रिकरणाच्या संख्येत वाढ, तसेच आपल्या राज्याला देशातील प्रमुख सिनेमा निर्मीती केंद्र म्हणून अधिक बळकटी मिळवण्यास मदत होणार आहे', असं आशिष शेलार म्हणाले. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'झोपेतच निधन झालं...'; 35 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, कुटुंबियांनी गुपचूप उरकलं अंत्यसंस्कार, महिनाभरानंतर पोस्ट शेअर करत दिली माहिती