Asha Bhosle Passed Away: दिग्गज गायिका आशा भोसले यांनी वयाच्या 93 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.(Asha Bhosle Death)आशाताईंनी अनेक सुपरहिट गाण्यांना आवाज दिलाय. तब्बल 8 दशकांचा सुरेल प्रवास आता थांबला असला तरी वयाच्या अखेरच्या टप्प्यातही त्या तितक्याच उत्साहात काम करत राहिल्या. 91व्या वर्षी त्यांनी दुबईत झालेल्या एका लाईव्ह परफॉर्मन्समध्ये अशी काही रंगत आणली की उपस्थित प्रेक्षक अक्षरशः थक्क झालेले.या कार्यक्रमात त्यांनी करण अहुजा यांच्या ‘तौबा तौबा’ हे गाणं केवळ त्यांनी गायलंच नाही तर त्यावर त्यांनी हुक स्टेप करत उपस्थितांनाही थिरकायला लावलं. पांढऱ्या साडीवर काळ्या बॉर्डरमध्ये, हातात माईक घेत स्टेजवर उभ्या असलेल्या आशाताईंचा हा अंदाज पाहून प्रेक्षक भारावून गेले. या परफॉर्मन्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.हा त्यांचा शेवटचा Live परफॉर्मन्स होता. (Asha BHosle Last Live Performance)
‘तौबा तौबा’ हे गाणं करण औजलाने स्वतः कंपोज आणि गायलेलं असून ते Bad Newz या चित्रपटात विकी कौशल, तृप्ती डिमरी आणि एमी विरक यांच्यावर चित्रित करण्यात आलं आहे.
आशाताईंचा हा व्हिडिओ पाहून करण औजला स्वतःही भारावून गेला. त्याने सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना हा क्षण ‘अविस्मरणीय’ असल्याचं म्हटलं. “संगीताची देवी आशा भोसले यांनी माझं गाणं गायलं, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे,” अशा शब्दांत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या.विशेष म्हणजे, वयाच्या 89व्या वर्षीही आशा भोसले यांनी हरी ओम या चित्रपटासाठी ‘जिंदगी तू चुप है कहां’ हे गाणं रेकॉर्ड केलं होतं. हरीश व्यास दिग्दर्शित या चित्रपटात अंशुमन झा आणि रघुबीर यादव यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.
बॉलिवूडमध्ये, ओ.पी. नय्यर आणि आर.डी. बर्मन यांच्यासोबतचे त्यांचे सांगीतिक सहकार्य अत्यंत गाजलं आणि सुपरहिट ठरलं. त्यांच्या अविस्मरणीय गीतांमध्ये 'दम मारो दम', 'पिया तू अब तो आजा' आणि 'आईये मेहरबान' यांसारख्या सदाबहार आणि अजरामर गीतांचा समावेश आहे.
