Suresh Bhat Birth Anniversary: महाराष्ट्रात आणि मराठी भाषेत गझल हा काव्यप्रकार रुजविणारे प्रसिद्ध कवी, गझलकार सुरेश भट यांचा आज जन्मदिवस आहे. 'गझल सम्राट' सुरेश भट यांचा जन्म अमरावती जिल्ह्यात झाला. त्यांचे वडील श्रीधर भट हे व्यवसायाने डॉक्टर होते. तर त्यांच्या आईला कवितांची खूप आवड होती. लहानपणापासूनच भटांना मराठी कवितांची आवड निर्माण झाली होती. ते अडीच वर्षाचे असताना पोलियोची बाधा झाल्याने त्यांचा उजवा पाय जन्मभरासाठी अधू झाला होता. यावरूनच त्यांनी पुढे एक शेर लिहिला होता की, 


राहिले रे अजून श्वास किती?
जीवना, ही तुझी मिजास किती?


सोबतीला जरी तुझी छाया
मी करू पांगळा प्रवास किती?


सुरेश भटांनी उर्दू भाषेतील शेर, शायरी, गझलचा सखोल अभ्यास केला. यानंतर त्यांनी मराठीत गझलेची बाराखडी लिहीत महाराष्ट्राच्या तळागाळात मराठी गझल रुजवण्याचे काम केलं. त्यांनी लिहिलेल्या मराठी गझल आणि बाराखडीमुळे महाराष्ट्रात गजल लिहणारी एक अख्खी पिढी तयार झाली असून ही परंपरा आजही कायम आहे. 


भटांनी लिहिलेलं ‘एल्गार’, ‘रंग माझा वेगळा’, ‘झंझावात’ इ. संग्रह आजही महाराष्ट्रात जुन्या पिढी सोबतच नवीन पिढीही तितक्याच आवडीने वाचते. भटांच्या काही निवडणुक गजल आणि शेर खालील प्रमाणे...                


जगत मी आलो असा की मी जसा जगलोच नाही ।
एकदा तुटलो असा की मग पुन्हा जुळलोच नाही ।।


कोण जाणे कोण हे जवळून गेले?


कोण जाणे कोण हे जवळून गेले?
चांदणे रक्तामध्ये मिसळून गेले!


जिंकला होता जरी मी डाव तेव्हा,
दान जे पडले मला उधळून गेले!


भेटण्यासाठी कुणी आलेच नाही…
लोक आलेले मला चघळून गेले!


हे खरे की, मी जरा चुकलोच तेव्हा,
लोकही वाटेल ते बरळून गेले!


लागली चाहूल एकांती कुणाची?
कोण माझ्या लोचनी तरळून गेले?


काय माझ्या मालकीचे अर्थ होते?
शब्द माझे भाबडे हुरळून गेले!


या दुपारी मी कुणाला हाक मारु?
ओळखीचे चेहरे वितळून गेले!


कोणता कैदी इथे कैदेत आहे?
रंग भिंतींचे कसे उजळून गेले!


पाठमोरा मी जरी झालो,तरीही
सूर्य येणारे मला कवळून गेले!      



आकाश उजळले होते


इतकेच मला जातांना सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते


ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही
मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते


गेलेल्या आयुष्याचा मधुमास गडे विसरू या
(पाऊल कधी वाऱ्याने माघारी वळले होते?)


मी ऐकवली तेव्हाही तुज माझी हीच कहाणी
मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते


याचेच रडू आले की जमले न मला रडणेही
मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रूंत मिसळले होते


नुसतीच तुझ्या स्मरणांची एकांती रिमझिम झाली
नुसतेच तुझे हृदयाशी मी भास कवळले होते


घर माझे शोधाया मी वाऱ्यावर वणवण केली
जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते


मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो
मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते