मुंबई : रात्रीस खेळ चाले या मालिकेतून शेवंताच्या भूमिकेला कमाल लोकप्रियता मिळाली. ही भूमिका तितकीच उत्तम साकारली ती अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने. ही मालिका बंद झाल्यानंतर अपूर्वाची लोकप्रियता कॅश करण्यासाठी तिला नवी मालिका मिळाली ती तुझं माझं जमतंय. या मालिकेत ती साकारत होती पम्मीची व्यक्तिरेखा. ही व्यक्तिरेखा आली तेव्हा याच्या बातम्याही खूप आल्या. कारण, अपूर्वा ही अनेकांसाठी हॉट केक बनली. ही मालिका सुरू होऊन काही महिने उलटतात न उलटतात तोच आता अपूर्वाने म्हणजेच जनमनात स्थान पटकावलेल्या शेवंताने ही मालिका सोडायचा निर्णय घेतला आहे.


तुझं माझं जमतंय या मालिकेचं चित्रिकरण अहमदनगरला चालतं. या मालिकेत सर्वंच नवे कलाकार आहेत. ही मालिका झी युवा या वाहिनीवर येते. सर्व नवं फ्रेश टॅलेंट आणि सोबत पम्मी साकारणारी लोकप्रिय अभिनेत्री अपूर्वा असं हे कॉम्बिनेशन चांगलं चालेल असं निर्माते आणि वाहिनीला वाटलं. त्यानुसार चित्रिकरणही सुरू झालं. पण आता मात्र या मालिकेतून पम्मी साकारणाऱ्या शेवंताने काढता पाय घेतला आहे. आता तिथे वर्णी लागली आहे ती प्रतीक्षा जाधव या अभिनेत्रीची. अपूर्वाने ही मालिका का सोडली याची अनेक कारणं सेटवरून कळतात. पैकी एक कारण, तिला सेटवर तिच्या मनाजोगती ट्रीटमेंट मिळत नसल्याचं समजतं. यावर निर्मात्यांनी तिला आपण ती ट्रीटमेंट मिळेल असं पाहू असंही सांगितलं. तर डिसेंबरमध्ये चित्रिकरणाच्या तारखांवरूनही काही वाद निर्माण झाल्याचं समजतं. या सगळ्याचं पर्यवसान अपूर्वाने मालिका सोडण्यावर झालं आहे.



सध्या इतर कोणतीही मालिका तिच्या हाती नसल्याचं कळतं. असं असताना अपूर्वाने मालिका सोडणं हे अनाकलनीय असल्याची चर्चा नगरच्या सेटवर रंगते आहे. अपूर्वाने ही मालिका सोडू नये म्हणून झीच्या वरिष्ठांनीही तडजोड करण्याचा प्रयत्न केला. परंतु 'शेवंता'ने मात्र हा 'खेळ' सोडायचा निर्णय घेतला आहे. आता तिच्याजागी येणारी प्रतिक्षा जाधव हिच्यासाठी मात्र हे आव्हान असणार आहे. ती पम्मीला कसा न्याय देते हे पाहाणं कुतूहलाचं ठरणार आहे.


रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या दुसऱ्या सीझनमध्ये अपूर्वाची एंट्री झाली ती शेवंताच्या रुपाने. आण्णा नाईक आणि शेवंता ही जोडी उभ्या महाराष्ट्राला खूपच भावली. यात शेवंताच्या अदांवर तरुणाई घाय़ाळ झाली. अपूर्वाने शेवंता इतकी अचूक साकारली की मालिकेत तिचा ट्रॅक वाढला. या मालिकेने अपूर्वाला सर्वं काही मिळवून दिलं. ही मालिका संपली तेव्हा अनेक लोक शेवंता आता दिसणार नाही या कल्पनेने हळहळले. पण काहीच दिवसांत अपूर्वा पुन्हा एकदा पम्मीच्या रुपात दिसणार असल्याच्या बातम्या आल्यानंतर तरुणाई आनंदून गेली. शेवंतापेक्षा पूर्ण वेगळी असलेली पम्मी साकारणं अपूर्वासाठीही आव्हान होतं. त्यातही ती नेटानं काम करत होती. म्हणूनच महिन्याचे 20 पेक्षा जास्त दिवस ती चित्रिकरणात व्यग्र होती. आता या मालिकेनंतर अपूर्वीची नवी मालिका किंवा चित्रकृती कोणती असेल ते पाहावं लागेल.