Anupam Shyam Death : टीव्ही मालिका तसेच अनेक चित्रपटांमध्ये लक्षवेधी भूमिका निभावणारे अभिनेते अनुपम श्याम ओझा (Anupam Shyam Death ) यांचं निधन झालं आहे. अनुपम श्याम मुंबईतील लाइफलाइन मेडिकेअर रुग्णालयात मागील 4 दिवसांपासून भर्ती होते, अनुपम श्याम यांचं मल्टीपल आॅर्गन फेल्युअरमुळे निधन झालं आहे.
अभिनेते यशपाल शर्मा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की अनुपम श्याम यांना डाॅक्टरांनी मृत घोषित केलं आहे. मागील 4 दिवसांपासून ते रुग्णालयात भर्ती होते. अनुपम श्याम यांचं मल्टीपल आॅर्गन फेल्युअर झालं होतं. सोबतच शुगर पण खूप अधिक होती. त्यांचे शव सकाळी त्यांच्या दिंडोशीतल्या न्यू म्हाडा काॅलनीतल्या निवासस्थानी नेण्यात येईल आणि त्यानंतर सकाळी 11.30 वाजता त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येतील.
अभिनेता अनुपम श्याम यांनी अनेक टीव्ही आणि चित्रपटात काम केली आहेत. त्यांच्या अनेक भूमिका देखील गाजल्या आहेत. मन की आवाज प्रतिज्ञामधील ठाकुर सज्जन सिंह ही भूमिका चांगली गाजली. प्रतिज्ञा 2 मध्ये पण ते काम करत होते.
अनुपम श्याम यांनी क्योंकि... जीना इसी का नाम है, अमरावती की कथाये, हम ने ली है शपथ आणि डोली अरमानों की सारख्या अन्य लोकप्रिय शो मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका केल्यात. त्यांनी परजानिया, बॅंडिट क्वीन, लगान, दिल से, नायक: द रियल हीरो और ऑस्कर विजेता फिल्म स्लमडॉग मिलियनेयर सारख्या चित्रपटात अभिनय केला आहे.
किडनीच्या त्रासाने होते त्रस्त
लाइफलाइन हॉस्पिटलमध्ये आलेल्या अनुपम यांच्या एक जवळच्या नातेवाईकानं सांगितलं की, अनुपम यांना अनेक दिवसांपासून किडनीचा विकार होता. सध्या ते व्हेंटिलेटरवर होते. एका आठवड्यापूर्वी त्यांना दवाखान्यात भर्ती करण्यात आलं होतं. मागील काही महिन्यांपासून ते डायलिसिसवर होते.
आर्थिक अडचणींचा करावा लागला सामना
काही दिवसांपूर्वी अनुपम श्याम यांचे भाऊ अनुराग श्याम यांनी एबीपी न्यूजशी बोलताना सांगितलं होतं की, मागील 9 महिन्यांपासून अनुपम श्याम डायलिसिसवर आहेत. आर्थिक तंगीमुळं मागील काही महिन्यांपूर्वी त्यांचे उपचार थांबवण्यात आले होते. सिने अॅंड टेलिव्हिजन आर्टिस्ट्स असोसिशन (सिंटा) आणि इंडस्ट्रीमधील काही कलाकारांनी त्यांचं दवाखान्याचं बिल भरायला मदत केली होती.