Anup Jalota On Abp Majha Mahakatta: 'मी कधीच धूम्रपान करत नाही. त्यामुळे तुमच्या आवाजासोबत छेडछाड होतो. तंबाखू, गुटखा खाल्ल्याने तुमचा आवाज पहिल्यासारखा राहत नाही. आपल्या भजनाने लोकांना मंत्रमुग्ध करणारे ज्येष्ठ गायक अनुप जलोटा (Anup Jalota) आज एबीपी माझाच्या (ABP Majha) महाकट्ट्यावर (Majha Maha Katta) आले होते. यावेळी त्यांनी काही गोष्टींवर स्पष्टपणे मत मांडलं आहे.
"आजही मला मी 27 वर्षांचा वाटतो...मी सलग अडीच तास गाऊ शकतो.."
अनुप जलोटा म्हणतात, आज माझं वय 72 आहे. पण आजही मला मी 27 वर्षांचा वाटतो..कारण मी आजही त्याच एनर्जीने गातो. संगीत सोबत माझं नातं वेगळंच आहे. आणि माझं ते 7 व्या वयातील गाणं आजही मला तितकीच प्रेरणा देतं. अनुप जलोटा म्हणतात, टेन्शन नावाची गोष्ट मला माहितच नाही, तणावापासून मी खूप दूर, तणाव तुम्हाला आनंद घेऊ देत नाही. आणि म्हणून मी नॉनस्टॉप 2 ते अडीच तास भजन करू शकतो. मला 15-16 व्या वयातचं समजलं की, राग हा सर्वात मोठा शत्रू, राग हा येऊ देऊ नका, कारण हा राग तुम्हाला दुसऱ्यांच्या चुकीमुळे होतो. चुकी दुसऱ्याची, मग स्वत:ला राग का येऊ देता. त्यामुळे रागावू नका..जे संत, कवी, महान गायक गात आले आहेत, त्यांचे थोडे गुण माझ्यात आल्याने माझा राग कंट्रोलमध्ये आहे. शास्त्रीय संगीत हे रागांच्या रचनेवर अवलंबून आहे. जे वेळेनुसार रचण्यात आले आहे. भोर भयो..हे भजन गात त्यांनी शास्त्रीय संगीताच्या बारकाईबद्दल सांगितलं.
तुमची कला लोकांच्या सेवेसाठीही समर्पित केली पाहिजे...
अनुप जलोटा म्हणतात, कलेला व्यवसायासोबत लोकांच्या सेवेसाठीही समर्पित केली पाहिजे. 'खजाना' फेस्टिवल मी, पंकज उदास आणि तलत अजीजने सुरू केलं, कॅन्सरच्या रुग्णांसाठी याच्या माध्यमातून मदत केली जाते. आमच्या संगीत कार्यक्रमाला कोणी नाही बोलतच नाही. कारण ते देवी सरस्वतीचं काम आहे. आणि त्यात लोकांच्या सेवेसाठी आहे. याच्या माध्यमातून लोकांचे सहकार्य आणि प्रेम नेहमीच मिळते.
पंकज उदास आणि अनुप जलोटा यांच्यात स्पर्धा, पण...
दिवंगत ज्येष्ठ गायक पंकज उदास आणि अनुप जलोटा यांच्यातील नातं कसं होतं? त्या काळात स्पर्धा असल्याचं म्हटलं जायचं, यावर अनुप जलोटा म्हणतात, लता मंगेशकर आणि आशा भोसले या दोन बहिणींमध्येही स्पर्धा होती, कधी कधी पंकज यांच्या फॅन्सना मी ऑटोग्राफ द्यायचो. म्हणजेच आमच्यात प्रेमाची स्पर्धा होती..मी भजनमध्ये व्यस्त होतो, पंकजजी गझलमध्ये व्यस्त होते. यावेळी त्यांनी 'चिठ्ठी आयी है' ही गाणं गात असं सांगत अनुप जलोटा यांनी पंकज उदास सोबतच्या आठवणींना उजाळा दिला
मी धूम्रपान करत नाही
वयाच्या 72 व्या वर्षी सुद्धा अशा गोड गळ्याची जादू कायम ठेवण्यासाठी काय करता? ''या प्रश्नावर उत्तर देतात अनुप जलोटा म्हणतात, की मी कधीच धूम्रपान करत नाही.,सिगारेटने तुमचा स्टॅमिना खराब होतो, तुमच्या आवाजासोबत छेडछाड होतो. तंबाखू, गुटखा खाल्ल्याने तुमचा आवाज पहिल्यासारखा राहत नाही. सकाळी उठल्यावर आवाजासाठी रियाज करतो, जलनेती करतो, योगा करतो, श्वासासाठी प्राणायाम करतो. हे सर्व केल्यानंतर शरीर सुदृढ राहणारच, माणसाला अशा काही गोष्टींवर संयम ठेवायलाच हवा" असं जलोटा म्हणाले.
AI एक मोठी संधी...पण शेवटी त्या मशीनला भावना कुठून येणार...
सध्या AI चा ट्रेंड सुरू आहे.सध्या आपण सोशल मीडीयावर असे व्हिडिओ पाहतोय, ज्याच्या माध्यमातून विविध गायकांच्या आवाजात AI व्हिडिओ बनवले जात आहे, तर यात AI बद्दल बोलताना अनुप जलोटा म्हणतात, AI ही आताची सर्वात मोठी संधी आहे.जे काम पूर्वी 2 तासांत होत होते, ते आता 5 मिनिटात करता येणं शक्य आहे, AI तुम्ही सांगाल त्या गायकाच्या आवाजात गाणं गाईल, पण त्याच्यात भावना नसतील, कारण मशीनला फक्त तांत्रिक गोष्टी माहितीयत. भावना, हृदय नाही..
"बिग बॉस कार्यक्रमात बोलावलं तर मी आजही जाईन"
"बिग बॉस कार्यक्रमात स्पर्धक म्हणून बोलावलं तर मी आजही जाईल, आजच्या काळात कोणाला इतकं पेड हॉलिडे मिळतं. बिग बॉसमध्ये माझा एक वेगळाच अनुभव होता. जसलीन मथारू सोबत तेव्हा नावही जोडलं गेलं, यावर अनुप जलोटा म्हणतात की, माझं आणि जसलीनचे तसे काही संबंध नाहीत, ते फक्त टीआरपीसाठी जोडण्यात आलं. आणि त्या सीझनची टीआरपी प्रचंड वाढली देखील होती. या गोष्टीमुळे माझ्या प्रतिमेला फारसा फरक पडला नाही, जास्तीत जास्त 2-3 महिने ती गोष्ट लोकांच्या डोक्यात राहते, नंतर विसरून जातात. माझ्यासाठी हा कमालीचा अनुभव होता..