Autograph : दिग्दर्शक सतीश राजवाडे यांचे दिग्दर्शन असलेली, एक जपून ठेवावी अशी लव्हस्टोरी 'ऑटोग्राफ' (Autograph) या चित्रपटामधून अंकुश चौधरी (Ankush Chaudhari), अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar), उर्मिला कोठारे (Urmila Kothare), मानसी मोघे (Manasi Moghe) हे मराठीतील आघाडीचे कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ‘ऑटोग्राफ’ ही कथा आहे प्रेम आणि प्रेमभंगाची व वर्षानुवर्षे जपलेल्या त्यांच्या आठवणींची. एका व्यक्तीच्या खऱ्या प्रेमाच्या शोधाची आणि त्याच्या या प्रवासात त्याला भेटलेल्या माणसांची ही कथा आहे. एका अनोख्या अशा दृष्टिकोनाची ही प्रेमकथा 'ऑटोग्राफ' 30 डिसेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटात मराठी चित्रपट सृष्टीतील अत्यंत प्रतिभावान कलाकार काम करत असून, चित्रपट अगदी ताज्यातवान्या संकल्पनेवर बेतला आहे. ही कथा आपल्या कायमची लक्षात राहील अशीच आहे. एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटच्या वतीने संजय छाब्रिया यांनी 'ऑटोग्राफ'च्या वर्षअखेरीस होणाऱ्या प्रदर्शनाची घोषणा नुकतीच केली. या चित्रपटात पडद्यावर आणि पडद्यामागे जी मोठमोठी नावे जोडली गेली आहेत, त्यामुळे या चित्रपटाबद्दल मराठी चित्रपटसृष्टीत एकच चर्चा आहे.
प्रत्येकजण आपल्या हृदयात आयुष्यभर जपून ठेवेल अशी कथा
सतीश राजवाडे हे आज एक घराघरात पोहोचलेले नाव आहे. केवळ एक प्रथितयश दिग्दर्शकच नव्हे, तर एक चांगला लेखक आणि अभिनेता म्हणूनही ते मराठी व हिंदी चित्रपसृष्टीत ओळखले जातात. अनेक लोकप्रिय आणि पुरस्कारविजेते चित्रपट त्यांच्या नावावर आहेत. मुंबई-पुणे-मुंबई ही तीन चित्रपटांची मालिका, प्रेमाची गोष्ट, ती सध्या काय करतेय, आपला माणूस आणि इतरही अनेक चित्रपटांचा त्यात समवेश आहे. 'ऑटोग्राफ'बद्दल बोलताना राजवाडे म्हणाले, ‘या चित्रपटामध्ये आपल्या प्रियजनांना जवळ आणण्याची आणि आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग असलेल्या व्यक्तींची आठवण करून देण्याची ताकद आहे. एखाद्या 'ऑटोग्राफ'प्रमाणे ज्या माणसांनी आपल्या आयुष्याला आकार दिला आहे आणि आपल्या आयुष्यावर आपला ठसा उमटवला आहे, अशांची आठवण ही कथा करून देते. या कथेत सुख-आनंद देणारे क्षण असतील, तसेच अपरिहार्यपणे चटका लावणारेही प्रसंग असतील. पण सरतेशेवटी अंतिम अनुभव हा हृदयाला भिडणारा असेल. ही कथा आपल्यापैकी प्रत्येकजण आपल्या हृदयात आयुष्यभर जपून ठेवेल अशीच आहे.’
'ऑटोग्राफ' प्रेक्षकांचं मन जिंकेल!
एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट ही मराठीमधील एक आघाडीची निर्मिती कंपनी आहे. कंपनीने गेल्या काही वर्षांमध्ये अत्यंत गाजलेल्या आणि लोकप्रिय ठरलेल्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. हृदयाला भिडणाऱ्या संकल्पना आणि जिव्हाळ्याच्या विषयांवरील या चित्रपटांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजनसुद्धा केले आहे. निर्माते संजय छाब्रिया आणि अश्विन आंचन पुन्हा एकदा 'ऑटोग्राफ'च्या माध्यमातून आपले हे वैशिष्ट्य अधोरेखित करण्यास सज्ज झाले आहेत.
एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटने आत्तापर्यंत ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘मुंबई-पुणे-मुंबई’ ही तीन चित्रपटांची मालिका, ‘वेडींगचा शिणेमा’, ‘बापजन्म’, ‘आम्ही दोघी’, ‘तुकाराम’, ‘आजचा दिवस माझा’, ‘हॅप्पी जर्नी’, ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘टाइम प्लीज’ यांसारखे अनेक दर्जेदार आणि गाजलेले चित्रपट दिले आहेत. त्याबाबतीत कंपनीचे नाव आदराने घेतले जाते. 'ऑटोग्राफ' प्रेक्षकांची मने आणि ह्रदये जिंकेल, असा ठाम विश्वास निर्मात्यांना आहे.
हेही वाचा :
TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या