Amol Kolhe Emotional Post After Mi Savitribai Phule serial Off-air: गेल्या काही दिवसांपासून मराठी मनोरंजन विश्वात 'मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले' (Mi Savitribai Jyotirao Phule) मालिका बंद करण्याचा निर्णय स्टार प्रवाह वाहिनीने घेतल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. अवघ्या 152 भागांमध्ये टीआरपीचे कारण देत ही मालिका गुंडाळण्यात आली. यानंतर स्टार प्रवाह वाहिनीच्या ( Star Pravah) निर्मात्यांवर प्रेक्षकांचा प्रचंड रोष वाढला आहे. सोशल मीडियावर ही मालिका बंद करू नये अशा आशयाच्या हजारो कमेंट्स व्हायरल होत आहेत. स्टार प्रवाहला 'बायकॉट' करा अशी मागणीही होऊ लागली आहे. ज्या सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुलेंनी विषमतेच्या अंधारात क्रांतीची ज्योत तेवत ठेवली, त्यांचा इतिहास जागवणाऱ्या 'मी सावित्री ज्योतीराव फुले' मालिकेला हटवून त्याजागी स्टार प्रवाह वाहिनी 'सूना येती घरा' ही मालिका सुरु करणार आहे. त्यामुळे आणखी किती दिवस कटकारस्थाने, घरगुती भांडणं, पाणी टाकून वाढवता येणाऱ्या मालिका दाखवल्या जाणार ? असा सवाल उपस्थित केला जातोय. दरम्यान, या मालिकेत महात्मा ज्योतिरावांची भूमिका साकारणारे अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी मालिका संपत असल्याने एक भावनिक पोस्ट केली आहे. या पोस्टची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.
खरंतर काही दिवसांपूर्वीच स्टार प्रवाह वाहिनीने टीआरपीच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आठ नव्या कोऱ्या मालिकांची घोषणा केली. मालिकांच्या या सपाट्यात 'मी सावित्रीबाई ज्योतीराव फुले ' मालिका बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. या मालिकेचा प्रेक्षक वर्ग मोठा आहे. अनेक जण टीव्हीवर, ओटीटीवर ही मालिका आवर्जून पाहतात. ऐतिहासिक मूल्य असलेली ही मालिका बंद होऊ नये, अशी प्रेक्षकांची अपेक्षा आहे.
अमोल कोल्हे यांची काळजाचा ठाव घेणारी पोस्ट ...
काही दिवसांपूर्वी अभिनेते डॉ अमोल कोल्हे यांनी मालिका अवघ्या पाच महिन्यात संपते आहे. अवघ्या 152 भागांमध्ये ही मालिका बंद होत आहे हे दुर्दैव असल्याचं म्हटलं होतं. मालिका बंद होऊ नये यासाठी त्यांनी प्रयत्नही केले. मात्र, चॅनल त्यांचा निर्णयावर ठाम असल्याचे पाहून अमोल कोल्हे यांनी एक भावनिक पोस्ट केली आहे. ते म्हणाले 'जेव्हा एक मार्ग बंद होतो, तेव्हा कुठेतरी नवी सुरवात खुणावत असते..थोडसं थांबणं आवश्यक असतं. जरा निवांत होणं गरजेचं असतं. पुन्हा नव्याने गणित मांडण्यासाठी..दुप्पट वेगाने झेपावण्यासाठी..नव्या उमेदीने नव्या लढ्यासाठी.. ' असं लिहीत त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. चॅनलवरील मालिका संपतेय, मात्र गोष्ट सुरू राहणार..! लढा थांबणार नाही ! असंही त्यांनी म्हटलं.
चाहत्यांच्या कमेंट्स
अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांच्या या व्हिडिओ खाली या मालिकेच्या चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिलं 'अमोल सर शेवटी सत्याचा विजय होतो. आपण करत असलेलं कार्य हे आज घराघरात गेलं आहे. सौ ज्योती चे विचार कधी संपणार नाही उलट ती ज्योत अजून झळकत राहील. ' अनेक चाहत्यांनी ही मालिका बंद करू नका अशा विनवण्या केल्या आहेत. काहींनी स्टार प्रवाह मालिका ' बायकॉट ' करा असं लिहिलं आहे.
हेही वाचा:
