Vikram Kakade Net Worth: राज्यातील 17 स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघासाठी 18 जूनला निवडणूक (Vidhan Parishad Election 2026) होणार आहे. या निवडणुकीसाठी पुणे विधान परिषदेतून महायुतीकडून राष्ट्रवादीचे काँग्रेसचे विक्रम काकडे (Vikram Kakade) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार सुनील टिंगरे (Sunil Tingre) देखील पुणे विधान परिषदेतून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र सुनील टिंगरेंना डावलून विक्रम काकडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. यानंतर राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी नाराजी देखील बोलावून दाखवली. दरम्यान, कुठलीही चर्चा नसताना पुण्यातून उमेदवारी दिल्याने विक्रम काकडे यांची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. तर विक्रम काकडे यांनी एकूण संपत्ती किती आहे, याबाबतची माहितीही निवडणूक आयोगाच्या पत्रामुळे समोर आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांचे निकटवर्तीय म्हणून विक्रम काकडेंची ओळख आहे. तसेच पार्थ पवारांनी विक्रम काकडे यांना पुणे विधान परिषदेसाठी शब्द दिला होता. दरम्यान, विक्रम काकडे यांच्याकडे सुमारे 150 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. दीडशे कोटींच्या संपत्तीमध्ये 78 कोटी 95 लाख 65 हजार 531 रुपयांची जंगम मालमत्ता आहे. यात साडेसात लाख रुपयांची रोख रक्कम आणि विविध बँकांमधील 29 लाख 53 हजार रुपयांच्या ठेवींचा समावेश आहे. याशिवाय 410 ग्रॅम सोने, 5 किलोहून अधिक चांदी, आलिशान बोटी, आलिशान घड्याळे, महागड्या गाड्यांचाही समावेश आहे. (Vikram Kakade Net Worth)
विक्रम काकडेंनी जय पवारांना दिलेय कर्ज- (Vikram Kakade Net Worth)
विक्रम काकडेंनी अजित पवार यांचे सुपुत्र आणि राष्ट्रवादीचे नेते जय पवार यांना तब्बल 10 कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. इतरही अनेक बड्या असामींना आणि कंपन्यांना कोट्यवधी रुपयांची कर्जे वाटली आहेत. यामध्ये परवेज ग्रँट यांना 2 कोटी 17 लाख रुपये, तर रुस्तुम भरोचा, काकडे प्रमोटर्स, काकडे डेव्हलपर्स, श्रीशा एंटरप्रायझेस आणि राज डेव्हलपर्स यांना मिळून सुमारे 40 कोटी 95 लाख रुपयांचे कर्ज दिल्याची माहिती समोर आली आहे.
कोण आहेत विक्रम काकडे? (Who Is Vikram Kakade)
1) खासदार संजय काकडे यांचे चिरंजीव.
2) अजित पवारांचे निष्ठावंत कार्यकर्ता.
3) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू.
4) उत्तम बांधकाम व्यावसायिक.
5) 4 वर्ष स्टेट शुटींग चॅम्पियन, राष्ट्रीय पातळीवरील संघात देखील सहभाग.
6) आंतरराष्ट्रीय पातळीवर इटली, फ्रान्स जर्मनी, थायलंड येथील थाय ओपन स्पर्धेतदेखील सहभाग.
विक्रम काकडेंना उमेदवारी कशी मिळाली? (Vikram Kakade Pune Vidhan Parishad Election 2026)
राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुण्यात विधानपरिषदेची उमेदवारी विक्रम काकडेंना देण्यात आल्यानं पक्षात नाराजी पहायला मिळतेय. ज्या संजय काकडे आणि अनिल भोसलेंबरोबर अजित पवारांच मोठा वाद झाला होता. त्यांच्याच मुलाला आमदारकी देण्यात आल्याने पक्षातील पदाधिकारी नाराज आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची पुणे महापालिकेतील सत्ता 2017 साली भाजपच्या पारड्यात जाण्यामध्ये संजय काकडे यांचा मोठा वाटा होता. त्यावेळी भाजपमध्ये असलेल्या संजय काकडेंनी राष्ट्रवादीचे अनेक नगरसेवक फोडून भाजपच्या गळाला लावले. जे राष्ट्रवादीचे नगरसेवक भाजपात गेले नाहीत त्यांचा साम, दाम, दंड, भेद वापरुन काकडेंनी पराभव घडवून आणला. दरम्यान, आर्थिक ताकद असल्यामुळे विक्रम काकडे यांना उमेदवारी मिळाली आहे, अशी काही कार्यकर्त्यांची भावना आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी आमदार विलास लांडे यांनी सांगितले. आमच्यातला प्रामाणिकपणे काम करणारा कार्यकर्त्याला उमेदवारी द्यावी, असे अनेक कार्यकर्त्यांना वाटत होते. त्यातल्या कोणालाही संधी दिली असती तरी पक्षाला बळकटी मिळाली असती, असेही विलास लांडे म्हणाले.
17 पैकी 11 जागांवर भाजपचे उमेदवार- (Vidhan Parishad Election 2026)
राज्यातील 17 स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघासाठी 18 जूनला निवडणूक होणार आहे. निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत काल संपली. मात्र त्यापूर्वी निवडणूक होऊ घातलेल्या सर्वच मतदारसंघांमध्ये राजकीय धुरळा उडाल्याचं पहायला मिळालं. विधान परिषद निवडणुकीत भाजपने मोठी झेप घेतलीय. 17 पैकी 11 जागांवर भाजपने उमेदवार दिले. गेल्या निवडणुकीत भाजप 7 जागा लढली होती, यंदा भाजपला चार अधिकच्या जागा मिळाल्यात. आधी जिंकलेल्या जागा सोडून इतर चार जागांवर भाजपचे उमेदवार उभे आहेत. विशेष म्हणजे भाजपला मिळालेल्या या चारही ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार होते. गेल्या विधानपरिषदेपेक्षा चार अधिक जागा भाजप यावेळी लढणार आहे.
