Amol Kolhe on Akshay Shinde Encounter : राज्याचे गृहमंत्री सरकार वाचवण्यामध्ये आणि कुणाकडे नेतृत्व जाणार यामध्ये मशगुल आहेत, असं म्हणत शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde) यांचा एन्काऊंटर झाल्याची मोठी बातमी सध्या समोर येत आहे. त्यावरच अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर झाल्याची मोठी बातमी सध्या समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी बदलापूरमधील एका शाळेमध्ये अक्षयने दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. त्यानंतर यामध्ये अक्षय शिंदे दोषी असल्याचं निष्पन्न झालं. पण पोलीस कोठडीत असताना अक्षयला ट्रान्झिट रिमांडसाठी घेऊन जात असताना त्याने पोलिसांची बंदूक हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळई स्वसंरक्षणासाठी अक्षय शिंदेवर गोळी झाडली असल्याची माहिती सध्या समोर आली आहे.
अमोल कोल्हे यांनी काय म्हटलं?
अमोल कोल्हे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत म्हटलं की, 'सोशल मीडियाच्या माध्यमातून ही बातमी वाचनात आली आणि एक संशयाची चादर निर्माण झाली आहे. म्हणजे अशा पद्धतीने जर आरोपी पोलिसांच्या ताब्यात असताना स्वत:वर गोळी झाडून घेत असेल तर नक्की पोलीस खात्याच्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. असं असताना राज्याचे गृहमंत्री सरकार वाचवण्यामध्ये आणि कुणाकडे नेतृत्व जाणार यामध्ये मशगुल आहे. स्वत: गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यात नागपूरमध्ये 240 दिवसांत 213 बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. त्यांच्याच होमटाऊनमध्ये ही परिस्थिती असेल तर त्यांचा किती वचक आहे हे स्पष्ट होतं. बदलापूरच्या बाबतीत जो प्रकार घडला आहे तो नेमका काय आहे याची सखोल चौकशी केली गेली पाहिजे आणि ते सत्य जनतेसमोर यायला हवं.'
गृहमंत्र्यांचे काही वचक आहे का? - पृथ्वीराज चव्हाण
काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, 'आज जी गोष्ट झाली त्यावरून राज्यातमध्ये काही कायदा सुव्यवस्था राहिली आहे की नाही असा प्रश्न पडतोय. अक्षय शिंदे यांचा एन्काऊंटर झाल्यानंतर या प्रकरणात कोण संस्थाचालक आणि आरोपी होते हे कधीही बाहेर येणार नाही. बदलापूर प्रकरणी राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. अशा परिस्थितीमध्ये या घटनेची सखोल चौकशी करण्याऐवजी आरोपीला मारून टाकले जाते. गृहमंत्र्यांचे काही वचक आहे की नाही?'