मुंबई : ऑक्टोबर उजाडला की अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांना प्रतीक्षा असते ती ११ ऑक्टोबरची. हिंदी सिनेसृष्टीमधला मैलाचा दगड असणारे महानायक अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस साजरा करण्याकडे प्रत्येकाचा कल असतो. पण यंदाचं वर्ष त्याला अपवाद असणार आहे. एकतर लॉकडाऊनमुळे सगळ्यांनाच घरी थांबावं लागलं आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे सोशल डिस्टन्सिंगला अमाप महत्व आलं आहे. अशात बिग बी यांच्या निवासस्थानी वाढदिवशी शांतीच असणार आहे.
अमिताभ यांचा 78 वा वाढदिवस रविवारी येत असला तरी त्या दिवशी अमिताभ बच्चन चित्रिकरणात व्यग्र असणार आहेत. कौन बनेगा करोडपतीचं चित्रिकरण सध्या ते करत असून जास्तीत जास्त वेळ या चित्रिकरणाला देण्यावर त्यांचा भर आहे. त्यामुळे या रविवारी ते बाहेरच असतील असं कळतं. तर ऐश्वर्या-आराध्या, अभिषेक हेही त्यावेळी घरीच थांबणार आहेत. साहजिकच श्वेता बच्चनही त्या दिवशी घरी येणार असून अत्यंत साधेपणाने घरच्या घरीच हा वाढदिवस साजरा केला जाणार आहे.
बच्चन कुटुंबियांच्या वतीने हे स्पष्ट करण्यात आलं आहे की, 'यंदाचा वाढदिवस साजरा करण्यासारखी स्थिती नाहीय. लोकांनीही स्वत:ची काळजी घ्यायला हवी. गर्दी टाळायला हवी आहे. त्यामुळे आम्ही काहीच नियोजन केलेलं नाही. नेहमीसारखा दिवस घालवण्याकडे आमचा कल असेल. अमिताभ यांनाही काम असणार आहेच. आपल्या वाढदिवशी आपण कामात व्यग्र असावं असं त्यांना नेहमी वाटतं. यावेळी ते कौन बनेगा.. च्या चित्रिकरणात व्यग्र आहेत. त्यामुळे तीच त्यांना वाढदिवसाची भेट असेल. कुटुंबियांसमवेत रात्री एकत्र जेवण घेणं हेच त्यातल्या त्यात वाढदिवस साजरा करणं असेत.'
अमिताभ यंदा 78 वर्षांचे होतील. वयाच्या साठीमध्ये अमिताभ बच्चन पुन्हा एकदा नव्याने झेपावले. त्याआधी त्यांना दिवाळखोर जाहीर करण्यात आलं होतं. त्याची कंपनी बुडित निघाली होती. पण त्यानंतर महोब्बते सिनेमा आला आणि दुसरीकडे कौन बनेगा करोडपतीची ऑफर आली आणि अमिताभ बच्चन यांनी पुन्हा एकदा भरारी घेतली. त्यानंतर आधीपेक्षा ते फारच उंच झेपावले. हा लॉकडाऊनचा काळही अमिताभ बच्चन पूर्णपणे घरी होते. या काळात त्यांना कोरोनाची लागणही झाली. पण उपचार घेऊन ते पुन्हा घरी परतले. ज्येष्ठ कलावंतांनी काम करण्याला केंद्राने मज्जाव केल्यामुळे बच्चन यांच्या करोडपतीला ब्रेक लागला होता. पण त्यानंतर कोर्टाने ही अट काढून टाकल्यावर अमिताभ यांचं चित्रिकरण सुरू झालं. हा शो पुन्हा टीव्हीवर आला आणि रसिकांनीही त्याला पुन्हा एकदा भरभरून दाद दिली.