Amitabha Bachchan Emotional Post On Dharmendra: आठवणींचे पाश कोणाला सोडवता येतील? काही व्यक्ती अशा असतात ज्यांची आठवण पुसता येणं शक्य नसतं. अशाच व्यक्तीमध्ये येणार नाव म्हणजे बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र. (Dharmendra) धरमपाजी यांच्या जाण्यानं तयार झालेली पोकळी पुन्हा भरून येणारी नाही. धर्मेंद्र यांचे 24 नोव्हेंबरला निधन झाले. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी जुहूच्या निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अनेक कलाकार धरमपाजींच्या जाण्यानं भावूक झाले आहेत. धर्मेंद्र यांचे खास मित्र आणि शोलेमधील ‘जय’ची भूमिका साकारणारे अमिताभ बच्चन (Amitabha Bachchan) यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
काही दिवसांपूर्वी धमेंद्र यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी अमिताभ बच्चन स्वतः गाडी चालवत धमेंद्र यांच्या घरी गेले होते. त्यानंतर सोमवारी त्यांच्या निधनाची बातमी आली. धर्मेंद्र यांच्यावर विलेपार्ले येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले. त्यावेळी अमिताभ बच्चन यांच्यासह अभिषेक बच्चनसोबत धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित होते. आपल्या ‘वीरू’ला गमावल्याने बिग बी खूपच अस्वस्थ झाले होते. रात्री उशिरा त्यांनी आपल्या जिवलग मित्राच्या आठवणी सांगणारी एक भावनिक पोस्ट शेअर केली.
अमिताभ बच्चन यांची मन हेलावणारी पोस्ट
अमिताभ बच्चन यांनी लिहिले "आणखी एक महान व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले. एक रिकामपण भरुन राहिलंय. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली शांतता असह्य आहे. एक निशब्द शांतता पसरलीय. धरम जी महानतेचे प्रतीक होते. त्यांचं भव्य व्यक्तिमत्त्व, विशाल हृदय आणि अद्भुत साधेपणा यासाठी ते कायम स्मरणात राहतील."
बिग बी पुढे लिहितात "ते पंजाबच्या गावातील मातीचा सुगंध घेऊन आले आणि आयुष्यभर तो जपला.जेव्हा प्रत्येक दशकात खूप काही बदलत राहिले अशा काळातही त्यांच्या भव्य फिल्मी प्रवासात ते कायम निष्कलंक राहिले, त्यांच्या जाण्याने आपल्या आजूबाजूची हवा हलकी झाल्यासारखी वाटते. हे असे एक रिक्त स्थान आहे, जे कधी भरून निघणार नाही.." असे म्हणत अभिनेते अमिताभ बच्चन यांनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या.
अमिताभ बच्चन यांचा हा भावनिक पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दोघांनी एकत्र अनेक सुपरहिट चित्रपटांत काम केले आहे, विशेष म्हणजे हे दोन्ही दिग्गज कलाकार आजही चित्रपटविश्वात सक्रिय होते.