मुंबई : बाहुबली चित्रपटाने एक नवी रेष मारून ठेवली आहे. सिनेमा मोठ्या पडद्यावर आणायचा असेल तर त्यासाठी तितकीच मोठी गोष्ट आणि तिचं सादरीकरणही भव्य असायला हवं हे बाहुबलीच्या राजामौली यांनी दाखवून दिलं. पहिला भाग निम्म्यावर ठेवूनही आलेला दुसरा भाग लोकांना आवडला. लोकांनी बाहुबली, शिवगामिनी, कटप्पा आदी सर्वांवर भरभरून प्रेम केलं. बाहुबलीचा आदर्श लक्षात घेऊन अनेक मोठे चित्रपट यायची तयारी करु लागले आहेत. अशातलाच एक चित्रपट वैजयंती फिल्मस बनवत आहे.
या कंपनीला 50 वर्षं पूर्ण झाल्याबद्दल एक मोठ्या चित्रपटाची घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. या चित्रपटाचं नवा गुलदस्त्यात आहे. पण यात पहिल्यांदाच प्रभास आणि दीपिका पदुकोण एकत्र काम करणार असल्याचं जाहीर झालं होतं. या दोन व्यक्तिरेखांव्यक्तिरिक्त आणखी या सिनेमात कोण असेल याचं कुतूहल प्रत्येकाला होता. त्याच माळेत आता तिसरं नाव जोडलं गेलं आहे, ते आहे बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांचं. अमिताभ यांनी आपल्या सोशल मीडियावरून यांची माहिती दिली. त्यासाठी वेगळा टीजर तयार करण्यात आला सून त्यात केवळ अमिताभ बच्चन असं ठाशीवपणे सांगण्यात आलं आहे. या सिनेमातली त्यांची भूमिका काय असेल.. त्यांची वेशभूषा कशी असेल ते अद्याप सांगण्यात आलेलं नाही. मात्र या चित्रपटात प्रभास, दीपिका आणि अमिताभ बच्चन हे तिघे एकत्र आल्यानंतर हा चित्रपट भव्य असणार यात शंका नाही.
अभिनेता प्रभासनेही अमिताभ यांचं स्वागत मनापासून केलं आहे. अमिताभ यांच्यासोबत काम करण्याचं आपलं स्वप्न या निमित्ताने पूर्ण होत असल्याबद्दल त्याने आनंद व्यक्त केला आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन नाग अश्निन करत असून हा चित्रपटाच्या या वर्षाखेरीपासून सुरूवात होईल असं बोललं जातं. हा चित्रपट भव्य तर असेलच शिवाय तो खर्चिकही असणार आहे. या चित्रपटाला दीपिका पडकोणने आजवरचं सर्वाधिक मानधन घेतलं असल्याचं कळतं. या चित्रपटाची उत्सुकता आता कमालीची वाढली आहे.