मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कलाकार मदतनिधीच्या नावाखाली किती मदत करतात या चर्चेला ऊत आलाय. बॉलिवूडचे बेताज बादशाह अमिताभ बच्चन यांना त्याचा अनुभव आला आहे. गेल्या काही दिवसांपासून बिग बी यांनी किती पैसै कोविडच्या मदतनिधीला दिले? याची विचारणा त्यांना सोशल मीडियाद्वारे केली जात आहे. याबद्दल अमिताभ बच्चन यांनी नाराजीही व्यक्त करून झाली. त्यांच्या ब्लॉगलाही सातत्याने कमी येणारा प्रतिसाद पाहता आपणही आता ब्लॉग लिहिणं थांबवावं की, काय असं त्यांना वाटू लागलं. पण आता त्यांनी त्याच आपल्या ब्लॉगमध्ये आपण लोकांना कशी मदत करत आहोत? ते सांगताना आपल्या मनातल्या काही गोष्टींना वाचा फोडली आहे.
अमिताभ बच्चन यांनी शनिवारी उशीरा लिहिलेल्या ब्लॉगमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणतात, मी कशी आणि किती मदत करतो, ते मी कधीच कुणाला सांगत नाही. कारण तो माझा स्वभाव नाही. मी गेल्या अनेक आठवड्यांपासून मदत करत आहे. इतकंच नव्हे, तर मदतनिधीसाठी पैसे मागणं, लोकांना पैसे जमा करायला सांगणं, हेही व्यक्तिश: मला पटत नाही. म्हणून मी मला जमेल, झेपेल तशी मदत करत असतो. आता मी किती मदत दिली? हे सांगणं मला योग्य वाटत नाही. पण एक नक्की आहे, एखादी मदतीची कॅम्पेन राबवल्यानंतर जेवढा निधी जमेल तेवढी मी मदत करत आहे.
आपल्या ब्लॉगमध्ये सांगताना अमिताभ बच्चन म्हणतात, "मी पब्लिक इंटरेस्टच्या अनेक जाहिराती केल्या. पण त्यात कुठेच मी निधी मागत नाही. कारण दुसऱ्यांकडे पैसा मागण्यापेक्षा आपणच मदत करावी असं मला वाटतं. गेल्या काही दिवसांपासून मी किती मदत करतो. कशी मदत करतो, यावर खूप बोललं जातं आहे. म्हणून गैरसमज होऊ नये म्हणून मी हे लिहितो आहे." असंही बच्चन आपल्या ब्लॉगमध्ये म्हणतात. लोकांकडे पैसे मागणं पटत नाही, असं बच्चन यांनी सांगितल्यामुळे कॅम्पेन राबवण्यासाठी आजवर ज्या कलाकारांनी मदतीची याचना केली आहे, ती सगळी मंडळी रडारवर आली आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :