Amitabh Bachchan Movie : कोणताही चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्यामागे अनेक गोष्टी घडत असतात. काही चित्रपट प्रदर्शन झाल्यानंतर त्यामध्ये अडचणी येतात, तर काही चित्रपटांमध्ये प्रदर्शनापूर्वीच अडचणी असतात. काही चित्रपटांना प्रदर्शनासाठी बराच काळ वाट पाहावी लागते. ज्यांनी 90च्या दशकात बॉलीवूडवर (Bollywood) राज्य केलं अशा बिग बी अर्थातच अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या चित्रपटाची कायमच प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिलेली असते. कोणत्या नव्या भूमिकेत अमिताभ प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची प्रेक्षक कायमच वाट पाहत असतात. पण सध्या अमिताभ त्यांच्या एका चित्रपटाची वाट पाहतायत. कारण तब्बल 12 वर्षांपासून हा चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहे.
पिकं, विकी डोनर, पिकू सारखे चित्रपट बनवणारा दिग्दर्शक शूजीत सिरकारचा एक चित्रपट गेली 12 वर्ष झालं प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहे. 'शूबाइट' असं या चित्रपटाचं नाव आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात बिग बी अर्थातच अमिताभ हे मुख्य भूमिकेत आहेत. 2012 मध्ये हा चित्रपट तयार करण्यात आला. परंतु अतंर्गत वादामुळे हा चित्रपट अजूनही रिलीज होऊ शकला नाही. नुकतच शूजीतने या चित्रपटाविषयी भाष्य केलं आहे, तसेच या चित्रपटातील अमिताभ यांच्या अभिनयाचं देखील त्याने कौतुक केलं.
दिग्दर्शकांना सिनेमाच्या रिलीजची प्रतीक्षा
बॉक्स ऑफिस वर्ल्डवाइडच्या एका रिपोर्टनुसार, शूजीतने या चित्रपटाविषयी भाष्य करताना म्हटलं की, शूबाइट हा चित्रपट माझ्या हृदयाच्या अत्यंत जवळचा आहे. अमिताभ यांच्यासोबतचा हा माझा पहिला सिनेमा आहे. माझी खूप इच्छा आहे की मी तुम्हाला दाखवावं की अमितभ यांनी त्या पात्राला कसा न्याय दिला आहे. अमिताभ हे त्यांच्या डायलॉग डिलीव्हरीसाठी ओळखले जातात. पण या चित्रपटात अमिताभ काहीही बोलले नाहीत. पण सध्या आम्ही वाद मिटवण्याचा प्रयत्न करतोय. मला आशा आहे की, हा चित्रपट लवकरच आम्ही प्रदर्शित करु.
रॉनी स्क्रूवाला यांच्या यूटीव्ही मोशन पिक्चर्स कंपनीने शूबाइटची सुरुवात केली होती. ज्यासाठी प्रसिद्ध हॉलिवूड चित्रपट निर्माता दिग्दर्शक मनोज नाईट शामलन यांनी ही कथा लिहिली होती. त्यांनी यूटीव्हीला तो बनवण्याची परवानगी दिली पण नंतर त्यांनी तो इंग्रजीतच बनवण्याचा निर्णय घेतला आणि आधी इंग्रजी चित्रपट प्रदर्शित होईल आणि त्यानंतर हिंदी असा पवित्रा त्यांनी घेतला. तेव्हापासून हा चित्रपट अडकला आहे.
शूजीत सरकारचा वो भी दिन थे चित्रपट दशकांनंतर प्रदर्शित
शुजित सरकार निर्मित 'वो भी दिन थे' हा चित्रपट 29 मार्च रोजी प्रदर्शित झाला होता. हा चित्रपटही अनेक वर्षांपासून अडकला होता. चित्रपटाचे खरे नाव 'बनाना' होते. मात्र नंतर त्याचे नाव बदलण्यात आले. 'वो भी दिन थे' OTT प्लॅटफॉर्म ZEE5 वर रिलीज झाला आहे. या चित्रपटात रोहित सराफ, आदर्श गौरव आणि संजना संघी मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शक साजिद अली आहेत.