Maharashtra Corona Cases : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून घातलेल्या निर्बंधांचा चांगलाच परिणाम झाल्याचं समोर येत आहे.  राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे दैनंदिन आकडे कमी होत आहे.  दैनंदिन आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होत आहे.  आज 40,294 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर 26,133 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.  आजपर्यंत एकूण 51,11,095 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 92.04% एवढे झाले आहे.


राज्यात आज 682 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.  सध्या राज्यातील मृत्यूदर 1.57% एवढा आहे.आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,27,23,361 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 55,53,225 (16.97 टक्के) नमुने पॉझिटीव्ह आले आहेत.  सध्या राज्यात 27,55,729 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 22,103 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.  राज्यात आज एकूण 3,52,247 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. 


मुंबईत मागील 24 तासात 1,299 रुग्णांना कोरोनाबाधितांची नोंद


मुंबईत मागील 24 तासात 1,299 रुग्णांना कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर मागील 24 तासात 1,827 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईत आजपर्यंत एकूण 6,51,216 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर 93 टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. सध्या मुंबईत एकूण सक्रिय रुग्ण 28,508 इतके आहेत. मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर 326 दिवसांवर गेला आहे. तर कोविड वाढीचा दर ( 15 मे ते 21 मे) 0.21 टक्के एवढा आहे. मुंबईत काल 1416 रुग्णांना कोरोनाबाधितांची नोंद झाली होती तर 1766 रुग्ण बरे होऊन घरी गेले होते.


पुण्यात  आज सलग तिसऱ्या दिवशी एक हजाराच्या आत रुग्ण


पुण्यात देखील कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहेत. आज सलग तिसऱ्या दिवशी एक हजाराच्या आत रुग्णांचे निदान झाले आहेत. आज पुण्यात 840 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर आज 1949 रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे. काल 21 मे रोजी पुण्यात 973 रुग्णांचं निदान झालं होतं तर 2496 डिस्चार्ज झाले होते. तर 20 मे रोजी 931रुग्णांचं निदान झालं होतं तर 1076 डिस्चार्ज झाले होते.  


महाराष्ट्रातील लॉकडाऊन 1 जूनला संपणार की वाढणार?
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात 1 जून 2021 सकाळी सात वाजेपर्यंत लॉकडाऊन आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आलेख उतरणीला आल्याचं चित्र आहे. त्यातच 'ब्रेक द चेन' अंतर्गत शिवभोजन थाळी आता 14 जूनपर्यंत मोफत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. त्यामुळे लॉकडाऊन 1 जूनला संपणार, वाढणार की निर्बंध हळूहळू शिथील होणार याबाबत उत्सुकता वाढली आहे. तर दुसरीकडे चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कोकण दौऱ्यावर गेलेल्या मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनमधून काहीशी सूट मिळेल, असे संकेत दिले आहेत. त्यामुळे लॉकडाऊनबाबत आता काय निर्णय होतो याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.