Anant-Radhika Wedding : मुंबईत सध्या एका राजेशाही सोहळ्याचे साक्षीदार अनेक दिग्गज होत आहेत. अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांचा लग्नसोहळा 12 जुलै रोजी पार पडला. रविवार 15 जुलै रोजी या सोहळ्याचा शेवटचा दिवस असून त्यांचे रिसेप्शन पार पडणार आहे. आतापर्यंत देशाच्या पंतप्रधानांसह ते जगभरातील दिग्गजांनी या सोहळ्याला हजेरी लावली. विशेष म्हणजे या सोहळ्यात सुरांची जबाबदारी ही मराठमोळे गायक अजय-अतुल यांच्याकडे होती.
अजय-अतुल यांच्या गाण्यावरच अंबानींच्या नव्या सुनेने लग्नमंडपात एन्ट्री घेतली. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्याचप्रमाणे अजय-अतुलसोबत बरीच गायक मंडळी या सोहळ्यात दिसली.
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
अजय-अतुलने अंबानींच्या सोहळ्यात देवा श्रीगणेशा हे गाणं गायलं. यासाठी अजय अतुल यांना शंकर महादेवन, सोनू निगम, श्रेया घोषाल यांनी देखील साथ दिली. त्यामुळे या आलिशान सोहळ्यात सिनेसृष्टीतल्या दिग्गज गायकांच्या सूरांनी देखील सोबत केली. सोशल मीडियावर या व्हिडीओची जोरदार चर्चा सुरु आहे.
अंबानींच्या सोहळ्यात या गायकांची हजेरी
गुजरातमधील जामनगर येथे अनंत-राधिकाच्या पहिल्या प्री वेडिंगचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात अमेरिकन पॉप सिंगर रिहानाने हजेरी लावली. त्यानंतर मुंबईत पार पडलेल्या संगीत सोहळ्यात जस्टिन बिबरला आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यानंतर आता लग्नसोहळ्यात सिनेसृष्टीतील दिग्गज गायकांचे सूर घुमले. त्यामुळे या सोहळ्यात सूरांचीही चांगलीच पर्वणी पाहुणे मंडळींना झाल्याचं पाहायला मिळालं.
अंबनींचा राजेशाही सोहळा
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट हे शुक्रवार 12 जुलै रोजी लग्नबंधनात अकडले. त्यानंतर शनिवार 13 जुलै रोजी त्यांचा शुभ आशीर्वाद सोहळा पार पडला. या सोहळ्याला शरद पवार, पंतप्रधान मोदी यांसह अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. त्यानंतर या सोहळ्यातील शेवटचा दिवस आता पार पडणार आहे. मुंबईतील बीकेसीमधील जिओ सेंटर येथे अनंत आणि राधिकाचं रिसेप्शन पार पडणार आहे.