Aishwarya Narkar On Ashok Saraf: मराठी सिनेसृष्टीवर (Marathi Industry) तब्बल तीन दशकांहून अधिककाळ अधिराज्य गाजवणारं मराठमोळं नाव म्हणजे, अशोक सराफ (Ashok Saraf). पद्मश्री, महाराष्ट्र भूषण असलेल्या अशोक सराफांनी नाटकं, सिनेमे आणि काही मालिकांमधूनही प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. कधी विनोदी, तर कधी गंभीर भूमिकांमधून अशोक सराफ रुपेरी पडद्यावर येत राहिले आणि रसिक-प्रेक्षकांचं मनोरंजन करत राहिले. लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांची जोडी म्हणजे, मराठी सिनेविश्वातील आजवरची सर्वाधिक गाजलेली जोडी. पण, त्याव्यतिरिक्त अशोक सराफांनी अनेक अभिनेते, अभिनेत्रींसोबत काम केलंय. अशीच एक अभिनेत्री म्हणजे, ऐश्वर्या नारकर (Marathi Actress Aishwarya Narkar). एका मुलाखतीत बोलताना ऐश्वर्या नारकर यांनी अशोक सराफ यांच्यासोबत काम करताना आलेला अनुभव शेअर केला आहे.
मराठी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) यांनी लोकशाही फ्रेंडलीला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना ऐश्वर्या नारकर यांनी अशोक सराफ यांच्यासोबत एक सिनेमा केला, त्यावेळचा एक किस्सा सांगितला. ज्या सिनेमात ऐश्वर्या नारकर यांनी अशोक मामांसोबत स्क्रिन शेअर केलेली, त्या सिनेमात अशोक सराफ यांनी ऐश्वर्या नारकर यांच्या सासऱ्याची भूमिका साकारलेली.
मराठी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी अशोक सराफांसोबतचा कोणता किस्सा सांगितला?
मराठी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर बोलताना म्हणाल्या की, "सून लाडकी सासरची' हा माझा पहिला सिनेमा होता आणि त्यात अशोक मामांनी माझ्या सासऱ्यांची भूमिका केली होती. या सिनेमाच्यावेळी मामांनी खूप मदत केली होती. तेव्हा मी अगदीच नवखी होते. कॅमेऱ्यासमोर कसं उभं राहायचं... कसं बोलायचं.. याबद्दल मला काहीच माहिती नव्हतं."
"मनोरंजन या क्षेत्रात येऊन मला अगदी एक वर्षच झालं होतं. मी त्याआधी नाटकच करत होते. त्यामुळे मला तितकासा अनुभव नव्हता. तेव्हा कोणताही सीन कधीही केला जायचा, त्यामुळे अभिनयातलं ते सातत्य आपल्याला कायम ठेवता येईल का? असा विचार माझ्या मनात यायचा. तेव्हा सेटवर मामांशिवाय काही इतर लोकांनीही मला मदत केली होती.", असं ऐश्वर्या नारकर म्हणाल्या.
दरम्यान, मराठी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी मराठी सिनेसृष्टीसोबतच हिंदी इंडस्ट्रीतही काम केलं. ऐश्वर्या नारकर आपल्या स्टायलिश अंदाजासाठी ओळखल्या जातात. ऐश्वर्या आणि त्यांचे पती अविनाश नारकर हे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. इन्स्टाग्रामवर ते सतत रील्स आणि फोटो पोस्ट करत नेटकऱ्यांचं मनोरंजन करतात.
महत्त्वाच्या इतर बातम्या: