Ahmedabad Plane Crash Vikrant Massey lost his cousin Brother : गुजरातच्या अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं विमान सरदार वल्लभभाई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन उड्डाण घेतल्यानंतर पुढच्या 50 सेंकदामध्ये कोसळलं. या अपघातात विमानातील 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्सपैकी केवळ एक जण बचावला आहे. एअर इंडियाचं हे विमान बोईंगचं ड्रीमलाईनर होतं. या विमानातील सर्व क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला आहे. एअर इंडियाच्या या विमानाचे कॅप्टन सुमित पुष्कराज सभ्रवाल होते. तर, फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदर होते. या विमानाचे फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदर हे विक्रांत मेस्सीचे काका क्लिफोर्ड कुंदर यांचा मुलगा होते.
अभिनेता विक्रांत मेस्सीनं या घटनेबाबत सोशल मिडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये मेस्सीनं या दुर्घटनेमुळं माझं मन दु:खी आहे. अहमदाबादच्या अनाकलनीय विमान दुर्घटनेत ज्यांनी जीव गमावला त्यांच्या कुटुंबीयांसाठी आणि प्रियजनांसाठी माझं ह्रदय तुटलंय असं मेस्सीनं म्हटलं.
विक्रांत मेस्सी पुढं म्हणाला की माझे काका क्लिफोर्ड कुंदर यांनी त्यांचा मुलगा क्लाइव्ह कुंदर याला गमावलं आहे. हे दुर्भाग्यपूर्ण आहे. क्लाइव्ह कुंदर या दुर्घटनाग्रस्त विमानातील फर्स्ट ऑफिसर होते. देवानं तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला आणि सर्व पीडितांना शक्ती प्रदान करावी, असंही मेस्सी पुढं म्हणाला.
एअर इंडियाच्या विमानाचे कॅप्टन सुमित सभ्रवाल हे होते. तर, क्लाइव्ह कुंदर हे एअर इंडियाच्या या फ्लाइटचे फर्स्ट ऑफिसर होते. सुमित सभ्रवाल यांच्याकडे 8200 हवाई उड्डाणाचा अनुभव होता. तर, क्लाइव्ह कुंदर यांच्याकडे 1100 तासांचा अनुभव होता.
एअर इंडिया विमान अपघातानंतर संपूर्ण देश स्तब्ध झाला आहे. विमान कोसळल्यानं या घटनेत अनेकांचा मृत्यू झाला. अक्षय कुमार, सनी देओल, शाहरुख खान, सलमान खान, परिणीती चोप्रा, आमीर खान, अनुष्क शर्मा या सिने कलाकारांनी विमान दुर्घटनेत ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त कल्या आहेत. विमान दुर्घटनेमुळं सलमान खाननं त्याचा एक इव्हेंट लांबणीवर टकला आहे. तो म्हणाला की ही वेळ सेलीब्रेशन करण्याची नाही.
दरम्यान, या विमानात 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स होते. यापैकी 169 भारतीय प्रवासी, 53 ब्रिटीश नागरिक, 7 पोर्तुगाल आणि 1 कॅनडाचा व्यक्ती होता. यापैकी एक ब्रिटीश व्यक्ती बचावला आहे.