Ae Bhau Dokan Nako Khau: काही नाटकं (Theatre) केवळ मनोरंजन (Entertainment) करत नाहीत तर, काही अजरामरही होतात. तब्बल 20 वर्षांपूर्वी रंगभूमीवर गाजलेलं 'ए.. भाऊ डोकं नको खाऊ!' (Ae Bhau Doka Nako Khau) हे नाटक पुन्हा एकदा रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रॉयल थिएटर आणि निर्माते मिहिर गवळी यांच्या या नव्या प्रयोगाचे दिग्दर्शक संतोष पवार असून, त्यांनी या नाटकातून या प्रवासातील काही अत्यंत हळवे पैलू उलगडले आहेत.
'ए.. भाऊ डोकं नको खाऊ!' या नाटकानिमित्त अतुल परचुरेच्या आठवणी ताज्या झाल्या (Classic Marathi Play Ae Bhau Dokan Nako Khau!)
'ए.. भाऊ डोकं नको खाऊ!' हे नाटक पुन्हा सुरू होत आहे. या प्रसिद्ध नाटकात विनोदाची अप्रतिम जाण असलेले अतुल परचुरे यांची महत्त्वाची भूमिका होती. आज कलाकार अतुल परचुरे आपल्यात नाहीत. त्यांची जागा घेण्यासाठी संतोष पवारांनी अशा एका व्यक्तीची निवड केली आहे, जो अतुलचा केवळ सहकलाकार नव्हता, तर त्याचा शाळकरी मित्रही होता, तो कलाकार म्हणजे विनय येडेकर.
संतोष पवार भावूक होत म्हणतात, "आम्हाला या भूमिकेसाठी असा कलाकार हवा होता, ज्याची स्वतःची एक स्वतंत्र शैली असेल. जो या पात्राला पूर्णपणे न्याय देईल. विनय आणि अतुल हे जिवलग मित्र होते. त्यामुळे या नाटकाचा वारसा पुढे नेण्यासाठी विनयशिवाय दुसरा चांगला पर्याय असूच शकत नव्हता", असं संतोष म्हणाले. "जरी दोघांच्या कामाच्या पद्धती वेगळ्या असल्या, तरी या मंचावर विनय जेव्हा वावरतो, तेव्हा त्या अभिनयात कुठेतरी अतुलच्या मैत्रीची सावली नक्कीच जाणवते", असंही संतोष पवार म्हणाले.
'बिटवीन द लाईन्स' दडलेली संहितेची जादू (Ae Bhau Dokan Nako Khau! Reopens Curtains with New Cast)
नाटकाच्या संहितेबद्दल बोलताना संतोष पवार म्हणतात, "गंमत म्हणजे, 20 वर्षांपूर्वी जेव्हा हे नाटक पहिल्यांदा माझ्यासमोर वाचलं गेलं होतं, तेव्हा ते मला फारसं आवडलं नाही. पण एक वर्षानंतर जेव्हा तीच संहिता पुन्हा माझ्या हातात आलीये, तेव्हा मी विनंती केली की मला वाचायला द्या, आणि जेव्हा मी स्वतः वाचलं तेव्हा कळलं हे एक परिपूर्ण नाटक आहे. एकाहून एक कॅरेक्टर्स, धमाल प्रसंग, आणि खरंच डोक्याला गुदगुल्या करणारी कथा आहे. प्रेक्षकांना एका नाटकातून जे जे हवं असतं ते ते सर्व या नाटकात आहे, हे जाणवलंय. त्याप्रमाणे नाटक केलं आणि नाटकाने इतिहास घडवला. आज 20 वर्षांनंतर नव्या संचात, पुन्हा हे नाटक नव्याने करताना एक वेगळंच समाधान मिळत आहे."
प्रेक्षकांचा विश्वास: एक प्रामाणिक प्रवास
दिग्दर्शक म्हणून संतोष पवार नेहमीच आपल्या मतांशी ठाम राहिले आहेत, यासाठी त्यांच्यावर टीकाही झाली, पण रंगभूमीवरचा त्यांचा प्रामाणिकपणा कधी ढळला नाही. "मी कधीही केवळ 'करायचं' म्हणून नाटक करत नाही. रसिक मायबाप प्रेक्षक जेव्हा तिकीट काढून येतात, तेव्हा त्यांचा माझ्यावर एक विश्वास असतो. तो विश्वास जपण्यासाठी मी प्रत्येक प्रयोगात माझं 100 टक्के देतो. आज मी जे काम करतोय, त्यावरच माझ्या पुढच्या नाटकाचं भविष्य अवलंबून असतं, याची मला जाणीव आहे. हे नाटक म्हणजे केवळ विनोद नाही, तर आमच्या मैत्रीची आणि रंगभूमीवरील निष्ठेची ही एक छोटीशी भेट आहे."
तगडा नटसंच आणि प्रयोगांचे वेळापत्रक
विनय येडेकर यांच्या सोबत संतोष पवार यांची अभिनयाची खडक धमाल खडाजंगी रंगणार आहे. त्यात आनंदा कारेकर, सानिका शिंदे, सोनाली मगर, आदित्य गटे आणि संकेत बिवलकर हे कलाकार आपल्या अभिनयाने रंग भरणार आहेत. संदेश बेंद्रे (नेपथ्य), शीतल तळपदे (प्रकाश योजना), आशुतोष वाघमारे (संगीत) आणि हास्या पवार (वेशभूषा) यांनी हे नाटक नव्या ढंगात सजवले आहे.
शुभारंभाचे प्रयोग कुठे अन् किती वाजता? (Ae Bhau Dokan Nako Khau Marathi play comeback)
1 मे 2026 (शुक्रवार): रात्री 8.30 वाजता - यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा.
2 मे 2026 (शनिवार): दुपारी 4.00 वाजता - मीनाताई ठाकरे नाट्यगृह, बोरिवली.'
महत्त्वाच्या इतर बातम्या:
Bigg Boss मराठीच्या सहाव्या सिझनचा धमाका; फिनालेने मोडले सर्व रेकॉर्ड्स, शो ठरला नंबर 1
