Actress Prarthana Behere on Priya Marathe death : मराठी मनोरंजनसृष्टीतून रविवारी (दि.1) धक्कादायक बातमी समोर आली. लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठे हिचं वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी निधन झालंय. गेल्या काही महिन्यांपासून ती कर्करोगाशी झुंज देत होती. मात्र अखेर या आजारावर मात करण्यात तिला अपयश आलं आणि तिनं जगाचा निरोप घेतला. प्रिया मराठे ही छोट्या पडद्यावरील एक नावाजलेली अभिनेत्री होती. तिनं ‘या सुखांनो या’, ‘चार दिवस सासूचे’, ‘तू तिथं मी’, ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’, ‘येऊ कशी कशी मी नांदायला’ अशा अनेक गाजलेल्या मालिकांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. आपल्या नैसर्गिक अभिनयामुळे ती प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली होती. अचानक झालेल्या या निधनामुळे मराठी कलाविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. तिच्या जाण्यानं प्रेक्षकांना, सहकाऱ्यांना आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, प्रिया मराठीचं निधन झाल्यानंतर अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिने इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून दु:ख व्यक्त केलंय.
अभिनेत्री प्रार्थना बेहेरेची पोस्ट जशीच्या तशी
ए वेडे प्रिया , पियू , परी , प्री ,ती माझ्यासाठी फक्त एक सहकलाकार नव्हती, ती माझ्या अतिशय जिव्हाळ्याच्याची मैत्रीण होती. माझी वेडे ... ❤️ आम्ही एकत्र घर शेअर केलं होतं. कितीतरी वेळा आम्ही तासन्तास बोलत बसायचो…मॅगी, भुर्जी, कॉफी… हे सगळं आमचं छोटंसं जग होतं. खूप साऱ्या गप्पा, काहीसं वेडं हसणं, रात्री उशिरा पर्यंत जागणं – त्या क्षणांना काही तोड नाही.
ती माझी इंडस्ट्रीतील पहिली मैत्रीण होती – आणि खरी सख्खी मैत्रीण. तिच्यामुळेच हे नवीन जग मला आपलंसं वाटलं. तिच्यासोबतच मी स्वतःला शोधलं, हसावं, रडावं आणि मोकळं व्हावं असं वाटलं.अभिनयाच्या सुरुवातीच्या दिवसांत जेव्हा सर्व काही नवीन, अनोळखी आणि वाटायचं, तेव्हा तिचं हसतं मुख, तिचं प्रेमळ बळ माझ्यासोबत होतं. तिच्यासोबत मी पहिला सीन केला, पहिल्यांदा camera शेअर केला ,
ती इतकी हसमुख , प्रामाणिक, भावनाशील आणि जिव्हाळ्याने भरलेली व्यक्ती होती की तिच्यासोबत क्षणभरही घालवला, तरी तो कायमचा लक्षात राहिला. कॅन्सरशी लढा देत असताना, एक वेळ अशी आली होती की तिची तब्येत थोडीशी सुधारली. तेव्हा ती माझ्या अलिबागच्या घरी आली होती. मी, ती आणि शाल्मली — आम्ही तिघींनी एकत्र इतका सुंदर वेळ घालवला की तो क्षण कायमचा मनात कोरला गेला आहे. ती खूप आनंदी होती…
तेव्हा तिने मला एका शांत स्वरात म्हटलं,“तुझं घर, तुझं वातावरण, तुझे हे कुत्रे… हे सगळं मला बरे करतंय. मला इथे येऊन बरं वाटतंय… जणू काही हे ठिकाणच मला heal करतंय.” कॅन्सरने तिचं शरीर झिजवलं, पण तिचं मन, तिचा आत्मा, तिचं खंबीरपणं – ते कोणतंही आजार हरवू शकला नाही. शेवटच्या क्षणापर्यंत तिने जगायला आणि हसवायला शिकवलं. ती गेली, पण तिच्या आठवणी, तिचं हास्य, तिचं अभिनयातलं तेज — सगळं अजूनही माझ्यासोबत आहे. माझ्या आयुष्याचा एक भाग तिच्यासोबतच गेला, आणि तो भाग मी जपून ठेवणार आहे — कायमचा.
इतर महत्त्वाच्या बातम्या